
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तीस आमदार आहेत. हे आमदार भाजपसोबत गेल्यास आघाडी सरकार कोसळू शकते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आघाडीची अनुक्रमे 10 आणि 20 मतं फोडली होती. ही मतं आणि शिंदे समर्थक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. (Eknath Shinde Latest Marathi News)
विधानसभेत सध्या 287 आमदार असून सत्ता काबीज करण्यासाठी 145 आमदारांचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेची 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसची 44 आणि अपक्ष व इतर पक्षांच्या सोळा आमदारांच्या मदतीने ठाकरे सरकार अस्तित्वात आलं होतं. त्यावेळी भाजपचे स्वत:चे 105 आणि सात अपक्ष व मित्रपक्षांचे आमदार होते. पण आता हे चित्र बदलले आहे.
राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आघाडीला धक्का दिला आहे. राज्यसभेत दहा तर विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीतील 20 आमदार फुटले. त्यामुळे भाजपला पाठिंबा मिळालेल्या आमदारांचा आकडा 133 वर पोहचला. त्यामध्ये काँग्रेस व शिवसेनेच्याही काही आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी बंड केले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 30 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांचा स्वतंत्र गट करून भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका शिंदे घेऊ शकतात. तसं झाल्यास भाजपला सत्ता स्थापनेस कोणतीही अडचण येणार नाही. भाजपला सहजपणे जादुई आकडा गाठता येईल.
शिंदे यांच्याकडे 30 पेक्षा कमी आमदार असले तरी भाजपला अपक्ष व इतर छोट्या पक्षांची साथ मिळू शकते. पण शिंदे यांच्याकडील आमदारांचं संख्याबळ कमी होत गेल्यास मात्र भाजपला सत्ता मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. राज्यसभा आणि विधान परिषदेचं अवघड गणित सोडवून फडणवीसांनी आघाडीला धक्का दिला. आता सत्तेचं गणित ते कसं सोडवतात, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
सध्याची पक्षनिहाय स्थिती -
भाजप - 106
शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53
काँग्रेस - 44
इतर - 29
एकुण - 287
भाजपचं सत्तेचं गणित -
भाजप - 106
शिंदे समर्थक - 30
अपक्ष - 07
एकुण - 143
भाजपला गरज - 02
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.