एकनाथ शिंदे अजितदादांपेक्षा वजनदार निघाले; ३५ आमदार घेवून बाहेर पडले...

Eknath Shinde | Ajit Pawar | ncp | BJP | Shivsena : अजित पवारांच्या बंडात आमदार माघारी फिरले होते...
Eknath Shinde | Ajit Pawar
Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला सुरुंग लावण्यासाठी ऑपरेशन लोटसची सुरुवात झाल्याचे स्पष्ट आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ३५ आमदारांना सोबत घेवून बंड पुकारले आहे. काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथील 'ली मेरेडियन' हे हॉटेल गाठले आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय गोटात सध्या मोठी खळबळ उडाली असून ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. (Eknath Shinde latest News)

तब्बल ३५ आमदारांसह शिंदे यांनी पुकारलेले हे बंड अलिकडील काळात झालेले सर्वात मोठे राजकीय बंड असल्याचे बोलले जात आहे. अलिकडील काळात महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी असताना अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसह सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांच्यासह १० आमदार होते. मात्र यातील बहुतांश आमदार दुपारपर्यंत माघारी परतले होते. त्यानंतर दोन दिवसांमध्ये स्वतः अजित पवार हे देखील माघारी परतले होते.

त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचे हे सर्वात मोठे बंड ठरले आहे. या संकटातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना 'वर्षा' बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे केवळ १८ आमदारच उपस्थित होते. याशिवाय शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपले बंधू अर्जून आबिटकर यांना पाठवून देत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह सध्या १९ आमदार असल्याचे समोर येत आहे. (Maharashtra political crisis News updates)

कोण होते बैठकीत उपस्थित?

आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह बैठकीला आमदार वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, संजय राठोड, प्रकाश फातरपेकर, राहुल पाटील, सुनिल प्रभू, दिलीप लांडे, उदय सामंत, राजन साळवी, योगेश कदम, सदा सरवणकर, अजय चौधरी, प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सुरतच्या 'ली मेरेडियन' या हॉटेलमध्ये ते स्वतः आणि जवळपास ३५ आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल आहेत, मात्र त्यांनीही आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आहे. या सर्व आमदारांनी शिवसेना सोडल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याची शक्यताही धुसर आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर सध्या संकट गडद झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com