
डोंबिवली : शिवसेनेत (Shiv Sena)फूट पडल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कार्यकर्ते विभागले गेले आहेत. दोन्ही गटातील समर्थकांमध्ये 'शिवसेना आमचीच'यावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. शाखेवर ताबा मिळविण्यासाठी दोन्ही गटातील समर्थक पुढे सरसावले आहेत. या सर्व घटनांमुळे डोंबिवलीतील (Dombivali) वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात होती, मंगळवारी त्याची प्रचिती सर्वांना आली.
शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळविण्यासाठी काल (मंगळवारी) शिंदे व ठाकरे समर्थक आपआपसात भिडले. शिंदे समर्थकांनी जोरदार विरोध केला. शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. यानंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शिंदे व ठाकरे गटात विभाजन झाल्याचे पाहायला मिळाले.
शाखेमध्ये चार खोल्या असून मधील दोन खोल्यांमध्ये शिंदे गटाने तळ ठोकला आहे. या खोल्यांना कुलुप लावून त्यांनी येथे ठाकरे समर्थकांना येण्यास मज्जाव केला आहे. शिंदे गटाने दमदाटी केली तरी ठाकरे समर्थकांनी मात्र सध्या शांततेची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही पोलिस देखील येथे तैनात आहे.
शाखांवर ताबा मिळविण्यासाठी शिंदे गटांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. दोन्ही गटांकडून जास्तीत जास्त सभासद नोंदणी व्हावी यासाठी शक्तीप्रदर्शन सुरु आहेत. मंगळवारी सायंकाळी शिंदे गटाने शक्ती प्रदर्शन करीत मोठ्या थाटात कार्यक्रमाचे आयोजन करीत सभासद नोंदणी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्याआधी दुपारी मोठ्या जमावासह शिंदे समर्थक अचानक मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शाखेवर त्यांनी कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही मोजक्या ठाकरे समर्थकांनी त्यांना प्रखर विरोध केला.
दोन्ही गटात यावेळी राडेबाजी झाली आणि शिंदे गटाने ठाकरे गटाला विरोध करीत शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. त्यानंतर दोन्ही गट शाखेचा ताबा सोडण्यास तयार नव्हते. त्यात ठाकरे समर्थकांनी शाखा आमच्या बापाची असल्याचे वक्तव्य काल केल्यानंतर शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी शाखा ही शिवसेनेची आहे, ती कोणाच्या बापाची नाही, असे विधान केले होते. याआधीही डोंबिवली पश्चिमेतील दिनदयाळ रोडवरील शाखेचा ताबा घेण्यावरुन दोन्ही गटात राडेबाजी झाली होती. यावेळी ठाकरे समर्थक डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांना शाखेत चोरी केल्याप्रकरणी अटक देखील करण्यात आली होती.
मंगळवारच्या या राडेबाजी नंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे दोन गटांत विभाजन झाल्याचे दिसून येत आहे. शाखेमध्ये चार खोल्या असून यातील मध्यभागी असलेल्या दोन खोल्यांवर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असून त्याबाजूला बैठक खोली आहे.
या दोन्ही कार्यालयांवर शिंदे गटाने ताबा मिळविला आहे. तर सुरुवातीची व शेवटची अशा दोन खोल्या या ठाकरे समर्थकांच्या ताब्यात आहेत. दोन ते तीन समर्थक केवळ शाखांत बसलेले असून पोलिसांचा देखील खडा पहारा शाखेच्या बाहेर आहे. जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत शांततेची भूमिका सध्या दोन्ही गटांनी घेतल्याचे चित्र शाखेत दिसून येत आहे. डोंबिवलीतील राजकीय वातावरण पेटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कल्याण- डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असले तरी, कट्टर शिवसैनिक मात्र आजही ठाकरे गटात सामील आहेत. शिंदे गटात दिग्गजांची फळी सामील झाली असली तरी त्यांना ठाकरे गटातील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आव्हान देत असल्याने शिंदे गट काहीसा चिंतेत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.