मी तर त्यावेळी परदेशात होतो...कागदोपत्री पुराव्यांसह अनुराग कश्यपचा दावा - director anurag kashyap said he was in foreign location for shooting at that time | Politics Marathi News - Sarkarnama

मी तर त्यावेळी परदेशात होतो...कागदोपत्री पुराव्यांसह अनुराग कश्यपचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 

मुंबई : अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. अनेक कलाकारांनी अनुरागची बाजू घेत त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अनुरागची चौकशी केली आहे. या चौकशीत त्याने सर्व आरोप फेटाळून लावत मोठा खुलासा केला आहे. 

पायल घोषसोबत गैरवर्तन आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनुरागला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार गुरुवारी (ता.2) अनुरागला चौकशीसाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यावेळी त्याचे वकीलही त्याच्यासोबत उपस्थित होते. लैंगिक अत्याचाराच्या आरोपप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनुरागची चौकशी केली आहे. 

चौकशीत अनुरागने सर्व आरोप फेटाळले आहेत. या चौकशीत त्याने स्वत:ची बाजू मांडण्यासाठी काही कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. कथित अत्याचार घडलेल्या ऑगस्ट 2013 च्या कालावधीत एका चित्रीकरणासाठी श्रीलंकेत गेलो होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. याबाबत विमानाचे तिकीट, इमिग्रेशन सर्व कागदपेत्रे उपलब्ध असल्याचे त्याने पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे. 

ड्रग्जबाबतच्या आरोपांचेही अनुरागने खंडन केले आहे. मी सिगारेट ओढतो परंतु ड्रग्ज घेत नसल्याचे त्याने चौकशीदरम्यान म्हटले आहे. याबाबत वर्सोवा पोलिसांनी त्याला ऑगस्ट व सप्टेंबर 2013 मध्ये परदेशात असल्याच्या दाव्यासंदर्भात अधिक पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी पायलची भेट घेतली. तसेच दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्‍यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. 

पायल घोषने एक ट्‌विट करत अनुरागने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले असून, मला वाईट वागणूक दिली होती. त्याच्यावर कारवाई करा, तेव्हाच या माणसाचे खरे रूप समोर येईल, असे म्हटले होते. माझ्या जिवाला धोका असून मदत करा, असे म्हणत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी साकडे घातले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख