शरद पवारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन अन् दिलीप मोहितेंची विधान भवनात एन्ट्री :

Sharad Pawar | Milind Narvekar | Rajya Sabha Election : नाराज दिलीप मोहितेंना विधानभवनात आणण्याची पडद्यामागची गोष्ट
शरद पवारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन अन् दिलीप मोहितेंची विधान भवनात एन्ट्री :
Sharad Pawar News, Dilip Mohite News, Milind Narvekar NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान सुरू असतानाही मतदान न करण्यावर ठाम राहिलेले पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहितेंनी (Dilip Mohite) आता पत्ते उघड केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांच्यावर नाराज असलेल्या मोहितेंची मनधरणी करून त्यांना विधान भवनात आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेतील नेमबाज खेळाडू मिलिंद नार्वेकरांवर (Milind Narvekar) सोपवली.

त्यानंतर कुरघोडीच्या राजकारणात माहीर असलेल्या नार्वेकर यांनी मोहितेंना विधान भवनात आणून महाविकास आघाडीचे पारडे जड केले. नार्वेकरांच्या फोनमुळेच आपण मतदानासाठी आल्याची कबुलीही माहितेंनी माध्यमांपुढे केली. यानिमित्ताने ठाकरेंसाठी चाणक्य असलेल्या नार्वेकरांनी पवारांचेही मन जिंकल्याचे दिसत आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

खेड-आळंदी मतदारसंघातील सुमारे अडीचशे फायली अडविल्याचा मोहितेंचा आरोप आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या भावांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचे कान भरले जात असल्यानेच माझ्यावर अन्याय होत आहे, असे मोहितेंचा दावा आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत एकेका मतासाठी झगडणाऱ्या आघाडीपुढे आणि सहावी जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या ठाकरेंसाठी मोहितेंची नाराजी डोकदुखीची ठरली होती. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्यानंतर मतदानात भाग न घेण्यावर मोहिते अडून बसले होते.

ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोचली. त्यानंतर या गडबडीत मुख्यमंत्री ठाकरे बोलले तरी मोहिते राजी होणार नसल्याने पवार यांनी शेवटी नार्वेकरांचा पर्याय निवडला. त्यानुसार मोहितेंचे गाऱ्हाणे ऐकून, त्यावर उपाय काढून त्यांना मतदानासाठी बोलाविण्याचा निरोप खुद्द पवार यांनीच नार्वेकरांना गुरुवारी फोन करून दिला. त्यापाठोपाठ जयंत पाटील हेही नार्वेकरांसोबत बोलले आणि नार्वेकरांनीही आपल्या स्टाइलने 'चक्रे' फिरवून मोहितेंना विधान भवनात येण्यास भाग पाडले. (Rajya Sabha Election Latest News)

मोहितेंच्या एका मताने महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला. पण आपण नार्वेकरांच्या एका फोनमुळे मतदानासाठी आल्याचे सांगून मोहितेंनी ठाकरे सरकारबद्दलची नाराजी लपवून ठेवली नाही. मात्र, नार्वेकर हे मुख्यमंत्री ठाकरेंचे सर्वेसर्वा असलेल्यांचा अनुभव घेतलेल्या मोहितेंनी त्यांना टाळले नाही. परंतु, आपली कामे अडून राहणार नाहीत, याचा शब्द घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी रुसलेले एक मत खेचून आणलेल्या नार्वेकरांना आता मोहितेंसाठी मुख्यमंत्र्यांकडे 'फिल्डिंग' लावावी लागणार आहे. अन्यथा मोहितेंच्या माध्यमातून विधान परिषदेला एका मताचा चेंडू निसटू शकतो, याचा अंदाज नार्वेकरांना आलाच असावा. (Rajya Sabha Election Latest News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in