
Mumbai News : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, देशात एक-देश एक निवडणुकीचा फॉर्म्युला राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते. सरकारच्या याच धोरणावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमधून जोरदार टीका केली आहे. सोबतच सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने इंडिया आघाडीने आता बैठका संपवून थेट मैदानात उतरलं पाहिजे, असा सल्लाही दिला आहे. (Latest Marathi News)
"हुकूमशहा लहरी असतो. तो कधी कोणता निर्णय घेईल हे सांगता येत नाही. संसदेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची वरात काढतील. त्यानंतर २०२४ च्या आधीच सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करतील," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमधून केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. केंद्राने माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा देणारं विधान केले आहे. त्यामुळे २०२४ उजाडण्याआधीच लोकसभा निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राऊत यांनी रोखठोकमधून भाजपवर टीका करतानाच इंडिया आघाडीत सर्व काही अलबेल असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सर्व काही विसरून काँग्रेसशी जुळवून घेणार आहेत. तर, चर्चा-बैठका थांबवून आता अॅक्शन मोडवर येण्याचा सल्ला लालूप्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी यांनी दिल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
येत्या काळात लवकरच इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यावर एकमत झालं आहे. ३० सप्टेंबरच्या आत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून निवडणूक प्रचाराच्या कामाला लागण्याचंही तयारी करण्यात आली आहे. इंडिया आघाडीचे स्ट्रक्चर तयार करणे आणि इतर समित्या स्थापन करून देशभर प्रचाराचं रान उठवून देण्यात येणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात काँग्रेसची स्थिती सुधारत आहे. पण स्वबळावर १५० जागा जिंकता येईल अशी काँग्रेसची स्थिती नाही. त्यामुळे इंडिया आघाडी हाच सध्या भाजपला एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप २०० जागांच्यावर जाणार नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी मित्र पक्ष लागतील आणि ते मित्र पक्षही भाजपला मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी रोखठोक मधून केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.