... तर तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आरे येथील जागाच कारशेडसाठी सोयीची आहे. मात्र, आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स केला जात आहे. मुंबईकरांच्या मेट्रोच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
Devendra Fadnavis's letter to the Chief Minister Uddhav Thakery on Metro issue
Devendra Fadnavis's letter to the Chief Minister Uddhav Thakery on Metro issue

मुंबई  : अधिकाऱ्यांकडून आरे येथील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे. आरे येथील जागाच कारशेडसाठी सोयीची आहे. मात्र, आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स केला जात आहे. मुंबईकरांच्या मेट्रोच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. कांजुरमार्गच्या जागेतून खाजगी व्यक्तींना होणाऱ्या फायद्यामुळे तुमच्यावरही संगनमताचा आरोप होईल, असे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या जागेबाबत होत असलेल्या दुर्लक्ष व पत्राबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, मेट्रो कारशेडसाठी आरेचीच जागा योग्य आहे. पण कारशेड आरेत करायचे नाही, हे आधीच ठरविण्यात आले आहे. नवीन कमिटीचा नुसता फार्स आहे. आरे कारशे़डची जागा 2031 पर्यंतच पर्याप्त असून त्यानंतर दुसरी जागा शोधावी लागेल, असे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पण मेट्रो-3ची अंतिम डिझाईन क्षमता ही 2053 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन केलेली आहे. आरेमध्ये अंतिम डिझाईन सामावून घेईल इतकी पर्याप्त जागा आहे. या जागेवर 160 झाडे असून जी 2053 पर्यंत टप्प्याटप्याने रिप्लँट करावी लागतील. पण कांजुरमार्गच्या जागेवारील तीन पट झाडे तोडावी लागतील.

याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल केली जात आहे. जागा बदलण्याच्या अट्टाहासापायी मुंबईकरांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तसेच वर्षभरात मिळणारी मेट्रो आता चार वर्ष विलंबाने मिळेल, हे मुंबईकरांवर अन्याय आहे. कांजुर मार्ग येथील जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी एक लाख घरे बांधण्याचा प्रस्ताव मागील राज्य सरकारकडे आला होता. त्यावर शासनाने समितीही नेमली. केंद्र सरकारकडे या जागेसाठी मागणी केली होती. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे फडणवीस म्हणाले.

कांजुर मार्गची जागा अंतिम झाल्यास त्याबाबत कायदेशीर प्रश्न निर्माण होतील. प्रकल्पाला चार वर्ष विलंब होईल. कारडेपो स्थानांतरीत केल्यास हजारो कोटी रुपयांचे होणारे नुकसान असेल किंवा खाजगी व्यक्तींना हजारो कोटींचा फायदा असेल या सर्व बाबतीत सत्य उघडकीस येईलच. आणि त्यावेळी विनाकारण आपल्यावरही संगनमताचा आरोप होईल. म्हणून मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने दिशाभुल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच आरे येथे कारडेपोचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com