मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आजही शिवसेना-भाजपमध्ये टपल्या टिचक्या आणि टोल्यांचा खेळ रंगला होता. सकाळी टपल्या टिचक्या झाल्यानंतर संध्याकाळी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ शेअर करून बाळासाहेबांना अभिवादन करताना शिवसेनेला टिचक्या मारल्या. बाळासाहेबांच्या भाषणातील काही मुद्दे मांडले. "जनतेने विश्वासाने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशांसाठी? पैशांचे लाचार व्हाल तर शिवरायचे नाव घेऊ नका, तो भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्याच्या रक्तात असता कामा नये. तुमच्याकडे लोक आदराने पाहतायत. तो आदर तसाच ठेवा,' असे बाळासाहेबांच्या भाषणातील निवडक सूचक वाक्य त्यांनी शेअर केली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी कायम संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारात भेसळ केली असेल; पण आम्ही नाही केली, असा टोला फडणवीस यांनी लगावला. अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मने छोटी होतात. ते आपल्यापलीकडचे पाहू शकत नाही; पण बाळासाहेबांचे मन राजासारखे होते, असा चिमटाही त्यांनी काढला.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!#BalasahebThackeray
#बाळासाहेबठाकरे pic.twitter.com/TPVfnA6sKn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावत, "स्थानिक पक्ष स्थापन करण्याची सुरुवात बाळासाहेबांनीच केली. शिवसेना होती म्हणूनच भाजप गावागावांत पोहचली. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व नव्हते. युती केल्यानंतर शिवसेनेबरोबरच भाजपचाही प्रचार झाला. त्यामुळे भाजप गावागावांत पोहचला. बाळासाहेबांनी युती केली नसती तर आज भाजप ग्रामीण भागात वाढला नसता, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याची प्रेरणा दिली, बळ दिले, हिंदुत्वाची लाट निर्माण केली. राज्याच्या, देशाच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. असा नेता शतकातून एकदाच निर्माण होतो, असेही राऊत यांनी नमूद केले. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर विविध पक्षांतील नेत्यांनी त्यांना अभिवादन केले.
बाळासाहेबांमुळे बॉलीवूड सुरक्षित!
आज मी शिवसेनेचा हिस्सा आहे; पण बाळासाहेबांबाबत नेहमीच आदर होता. बाळासाहेब मातोश्रीत होते म्हणून चित्रपटीसृष्टी सुरक्षित होती. आमच्याकरता बाळासाहेब आणि त्यांचे विचार अजूनही तसेच आहेत, अशी भावना व्यक्त करत सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे, असे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने नमूद केले.

