मुलाखतीवेळी माझाही कॅमेरा असेल...फडणवीसांनी मुलाखतीसाठी राऊतांना घातल्या अटी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांची भेट ही मुलाखतीसाठी झाल्याचे समोर आले आहे.
devendra fadnavis said he will bring his own camera for interview with sanjay raut
devendra fadnavis said he will bring his own camera for interview with sanjay raut

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता.26) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेर ही भेट मुलाखतीसाठी असल्याचे समोर आले होते. फडणवीस यांना या मुलाखतीसाठी काही अटीही घातल्या आहेत. 
फडणवीस आणि राऊत यांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये काल दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत ही भेट झाली होती. या वेळी भाजपकडून किंवा शिवसेनेकडून इतर कोणीही नेते उपस्थित नव्हते. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यातील सध्याचे कटुतेचे संबंध लक्षात घेता हे दोन नेते भेटणे महत्त्वाचे मानले जात आहे. या प्रकरणी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळून लावत असा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेशी आम्ही हातमिळवणी करणार नाही. महाविकास आघाडीच्या कामाबद्दल राज्यातील जनता नाराज आहे. हे सरकार त्याच्या नाकर्तेपणामुळे पडेल. ते आम्ही पाडण्याची आवश्यकता नाही. राऊत यांची भेट ही मुलाखतीसाठी झाली होती. मात्र, यासाठी मी त्यांना काही अटी घातल्या आहेत. ही मुलाखत अनएडिटेड असावी आणि माझा कॅमेराही मुलाखतीवेळी असेल, अशा या अटी आहेत. 

फडणवीस आणि राऊत यांच्यात काल दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांने दिले. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे की काय, अशी शंका बोलून दाखवली जात होती. मात्र, शिवसेनेतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाआघाडी सरकार स्थिर असून अजिबात धोका नसल्याचा दावा केला होता. यामागे असलेले मुलाखतीचे कारण समोर आल्यानंतर ही चर्चा थांबली होती. बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाली होती. 

संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी फडणवीस यांची इच्छा आहे. अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले होते. 

संजय राऊत हे विविध निमित्ताने मोदी सरकारवर टीका करत असतात. तसेच, भाजपचे नेतेही सुशांतसिंह राजपूत आत्महत्येच्या प्रकरणाच्या निमित्ताने थेट 'मातोश्री'कडे बोट दाखवत असतात. या वातावरणात या दोन नेत्यांची भेट म्हणजे पुन्हा सलोख्याचे प्रयत्न आहेत की काय, अशी शंका व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मुलाखत घेण्यासाठी ही भेट झाल्याने सरकार पाडण्याचा आणि या भेटीचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com