Rajya Sabha Election : फडणवीसांचा आघाडीला सुरुंग ; शिवसेनेला मोठा धक्का

सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवेसेनेच्या संजय पवार यांचा पराभव पराभव केला.
Rajya Sabha Election : फडणवीसांचा आघाडीला सुरुंग ; शिवसेनेला मोठा धक्का
Uddhav Thackeray, Sanjay Rautsarkarnama

मुंबई : अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. महाविकास आघाडीकडील दहा मते फुटली व सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. शनिवारी पहाटे चार वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर शनिवारी पहाटे साडेतीन वाजता पहिला निकाल जाहीर करण्यात आला. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवेसेनेच्या संजय पवार यांचा पराभव पराभव केला.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यात सहाव्या जागेवरून महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला. अपक्ष आणि छोट्या पक्षांना गळाला लावण्याच्या शर्यतीपासून एकमेकांचे आमदार फोडण्याच्या चाली खेळल्या गेल्या. त्यामुळे या जागेकडे साऱ्यांचे होते. त्यात भाजपने बाजी मारली. अपक्ष आणि बहुजन विकास आघाडी, एमआयएम, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षाच्या मतांवर दोन्ही गटांचा डोळा होता. त्यात भाजपची सरशी झाल्याचे मतदानाच्या आकड्यांवरून दिसत आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून आक्रमक झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेते सकाळपासून विधान भवनात ठाण मांडून होते. मतदान कसे केले, यावर साऱ्यांचीच नजर होती. निकाला जाहीर होइपर्यंत एकाही बड्या नेत्यांनी विधानभवन सोडले नव्हते.

कांदे याचे मत बाद

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पहाटे एकच्या सुमारास दिला. त्यानंतर मतदानानंतर साडेआठतासांनी राज्यसभा निवडणुकीसाठीची महाराष्ट्रातील मतमोजणी सुरू झाली. दरम्यान, कांदे यांच्याबाबतच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे सूतोवाच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठीचे मतदान शुक्रवारी सकाळी सुरू झाले. दुपारी चार वाजेपर्यंत २८८ पैकी २८५ जणांचे मतदान पूर्ण झाले. अटकेत असलेल्या अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानासाठी जामीन न्यायालयाने दिला नाही. शिवसेनचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाल्याने एक जागा रिकामी आहे.

सांयकाळी पाच वाजता मतमोजणी सुरू होणार होती. परंतु, त्यापूर्वीच महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवरच भाजपने जोरदार आक्षेप घेतला. याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल व पक्षनेते ओम पाठक यांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी आयोगात पोहोचले व त्यांनी वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.

 Uddhav Thackeray, Sanjay Raut
आघाडीची मतं फुटली नाही, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली : शरद पवार

"महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस), यशोमती ठाकूर (काँग्रेस) आणि सुहास कांदे (शिवसेना) यांनी आपल्या मतपत्रिका मतदान करण्याआधी आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींच्या व्यतिरिक्त इतरांना जाहीरपणे दाखविल्या, त्यांची मते संपूर्ण बाद करावीत," अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली होती.

"सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांनी नियम पाळले नाहीत," असा आक्षेप काँग्रेसनेही घेतला आहे. दुपारी काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी सदर आक्षेप घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाने केलेल्या तक्रारीत असा उल्लेख नाही. संध्याकाळी उशिरा ‘मविआ’ने अशी तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

भाजप व महाविकास आघाडीने घेतलेल्या आक्षेपांबाबत तपासणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रण मागवून घेतले. त्याची तपासणी केली. तसेच याबाबत व्हिडिओद्वारे सुनावणीही घेतली. त्यानंतर शनिवारी पहाटे एकच्या सुमारास कांदे यांचे मत बाजूला ठेवून मत मोजणी सुरू करण्याचे आदेश दिले.

जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवर आणि रवी राणा यांच्याविरुद्धचे आक्षेप आयोगाने फेटाळून लावले. त्यामुळे मतदान झालेल्या २८५पैकी २८४ मतदानपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली.

पहिल्या राऊंडमधील मतांची आकडेवारी

 • भाजपचे उमेदवार पियुष गोयल विजयी (48 मतं)

 • भाजपचे उमेदवार अनिल बोंडे विजयी (48 मतं)

 • शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत विजयी (41 मतं)

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल विजयी (43 मतं)

 • काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रतापगडी विजयी (44 मतं)

 • शिवसेनेचे संजय पवार यांना (33 मतं) (पहिल्या फेरीतील मतं)

 • भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (27 मतं) (पहिल्या फेरीतील मतं)

दुसरी फेरी

भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी दुसऱ्या फेरीअखेर 41.58 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला.

शिवसेनेचे संजय पवार यांना दुसऱ्या फेरी अंती 39.26 मतं मिळाली. ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

 • आमदार सुहास कांदे यांनी मतपत्रिकेची घडी घातली नाही.

 • घडी न घालताच मतपत्रिका घेऊन कांदे पक्षाच्या अधिकाऱ्याकडे गेले.

 • अधिकाऱ्याच्या कक्षा बाहेरूनच त्यांनी मतपत्रिका दाखवली.

 • कक्षात जाऊन मतपत्रिका दाखवण्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी केली असता ती पाळली नाही.

 • आमदार कांदे मतपत्रिका हातात घेऊन लोकांशी बोलत उभे राहिले.

 • हातातील मतपत्रिका कॅमेऱ्यामधून दिसत होती. अधिकृत व्यक्तीशिवाय अन्य लोकांनाही त्यांचे मतदान दिसत होते.

 • आमदार कांदे यांचे कृत्य मतदानाचा गोपनीयतेचा भंग आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in