देशमुखांनी 100 कोटी मागितले का? पोलीस उपायुक्त भुजबळांनीच दिलं उत्तर

चांदीवाल समितीसमोर पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची उलटतपासणी घेण्यात आली.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज पोलीस उपायुक्त राजू भुजबळ (Raju Bhujbal) यांची उलटतपासणी झाली.

अॅड. शेखर जगताप यांनी उपायुक्त भुजबळ यांची उलट तपासणी घेतली. या वेळी ते म्हणाले की, १ मार्च ते १० मार्च २०२१ मध्ये मी विधानसभा बंदोबस्ताला होतो. माझी ४ मार्चला नियमित बैठक ज्ञानेश्वरीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत होती. या भेटीवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील सोबत असताना संजीव पलांडे हे मला भेटले. त्यावेळी पैशांसंदर्भात कुणासोबत आणि कोणतीही चर्चा झालेली नव्हती. त्यावेळी गृहमंत्रीही बंगल्यावर नव्हते.

मुंबईतील १ हजार ७५० बार मधून वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. मुळात त्यावेळी कोरोना संकटामुळे ३००-३५० बार पैकी १७०-१७५ बार सुरू होते. यातून कुठलीही वसुली करण्यात आलेली नाही. ही बाब मी माझ्या प्रतिज्ञापत्रातही आहे. आम्ही देशमुखांना भेटायला गेलो त्यावेळी पलांडे यांनी आम्हाला कुठलेही वसुली संदर्भातील टार्गेट दिले नव्हते. तसेच, या विषयावर चर्चा झाली नव्हती. गुन्हे शाखेचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर सचिन वाझेही आहे. या ग्रुपवर पोलिसांच्या चांगल्या कामाचे कौतुक व्हायचे. सचिन वाझे यांच्या चांगल्या कामाचेही कौतुक झालेले आहे.

Anil Deshmukh
जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? निवडीच्या 24 तास आधी नाराज तेली राणेंच्या भेटीला

मला वाझेने माहिती दिली नाही असे कधी घडले नाही. परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र व्हायरल झाले. त्यात करण्यात आलेल्या आरोपावरून सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी मागील वर्षी २० मार्चला माझी चौकशी केली. एसीपी संजय पाटील यांनी बार, हुक्का पार्लस आणि इतर ठिकाणी केलेल्या कारवाईची वेळोवेळी माहिती मला आणि वरिष्ठांना दिली होती. माझ्या परवानगीशिवाय ते कुठेही कारवाईला जात नव्हते.

Anil Deshmukh
भाजप नेत्यामुळं मलिक अडचणीत; न्यायालयात मागावी लागली माफी

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा चांदीवाल समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in