
मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. अशातच आता महिला नेत्यांमध्येही चढाओढ सुरु झाली आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भाजपा नेत्या उमा खापरे यांनी त्यांना थेट घरात घुसून बदडून काढण्याचाच इशारा दिला आहे. त्यावर दिपाली सय्यद यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? असा प्रतिप्रश्न केला आहे. (Shivsena-BJP dispute latest news)
- काय आहे प्रकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोललो तर लगेच प्रसिद्धी मिळते हे त्यांना माहित आहे. पण यापुढे जर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्ये केलं तर तिला घरात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा भाजपा नेत्या उमा खापरे यांनी दिला.
या इशाऱ्यावर बोलताना दिपाली सय्यद यांनीही उमा खापरेंच्या सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुम्ही काय माझ्या घरात घुसणार? तुमच्यात तेवढी ताकद आहे का बघा,” असा खोचक टोला सय्यद यांनी भाजपाला लगावला आहे.
“कोणाबद्दल असं बोललं नाही पाहिजे. पंतप्रधान जसे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत तसे मुख्यमंत्री नाही का, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला तुमच्याकडे काही किंमत नाही का?असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला आहे. तुम्ही काहीही बोललं तर चालतं, उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे का? असही त्यांनी विचारलं आहे. काय करायचं ते करा…येताय ना माझ्या घरी, पाहतेच मी,” असं प्रती आव्हानच दिपाली सय्यद यांनी दिलं आहे.
दिपाली सय्यद म्हणतात...
“पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह बोलणं नक्कीच चुकीचं आहे, पण याची सुरुवात कोणी केली? देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी बायको माझंच ऐकत नाही. म्हणून त्यांनी तिला वाऱ्यावर तर सोडलं नाही ना? ती बोलते भाजप सर्व खपवून घेतचं ना. मग ती कोणाबद्दल बोलते? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबतच बोलतात ना. किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्याबाबत वक्तव्ये केली, चंद्रकांत पाटील मसणात जा बोलले आणि नंतर त्यांनीही पलटी मारली. म्हणजे तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र. तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार? तुमच्यात तेवढी ताकद आहे का बघा. केस करायची असेल तर आधी तुमच्या नेत्यांवर करा. माझ्यावर केस केली तर तुमचेही दोन नेते आतमध्ये घेऊन जाईन,” असा इशारा दिपाली सय्यद यांनी भाजपला दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.