वादग्रस्त पोलिस अधिकारी पराग मणेरे पुन्हा सेवेत; ठाकरे सरकारने केलेले निलंबन मागे

Parag Manere | परमबीर सिंग यांच्यासह भ्रष्टाचार आणि खंडणी वसूलीचे झाले होते आरोप...
Parag Manere
Parag ManereSarkarnama

मुंबई : वादग्रस्त पोलिस उपायुक्त पराग मणेरे (Parag Manere) यांच्यावरील निलंबनाची कारवाई शिंदे सरकारने (Shinde Government) मागे घेतली असून मणेरे यांना पुन्हा शासन सेवेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. २०२१ मध्ये ठाकरे सरकारने (Thackeray Government) पराग मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित केले होते. यासोबतच खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मणेरे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. मणेरे हे त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त होते.

नागपूर येथे उत्पादन शुल्क विभागाचे अपर पोलीस अधीक्षक असताना मणेरे यांना बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १०५/२०२१ आणि ठाणे येथे सेवेत असताना कोपरी पोलीस ठाणे कल्याण व गुन्हा नोंद क्रमांक १७६/२०२१ या गुन्ह्यांच्या अनुषंगाने निलंबित करण्यात आले होते. याशिवाय बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या प्रकरणातही मणेरे यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी परमबीरसिंग यांच्याशी संगनमत करुन खोट्या गुन्हात अडकविल्याचा आणि खंडणी वसूल केल्याचा आरोप मणेरे यांच्यावर झाला होता. या प्रकरणात त्यांची बदलीही झाली होती.

श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार २२ जुलैला मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील, पोलिस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त निमीत गोयल यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते.

त्यानंतर या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त आणि एका निरीक्षकाची बदली सशस्त्र विभागात करण्यात आली होती. यामध्ये पराग मणेरे यांचाही समावेश होता. तर गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे आणि पोलिस निरीक्षक आशा कोरके यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. अशा परिस्थिती नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत ठेवणे प्रशासकीय दृष्ट्या योग्य ठरणार नसल्याने त्यांची बदली केली जात असल्याचे आदेशात म्हटले होते.

आजच्या शासन आदेशात काय म्हटले आहे?

पराग शाम मणेरे, निलंबित अपर पोलीस अधीक्षक यांना त्यांच्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणी मा. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तसेच त्यांच्याविरुद्धच्या प्रलंबित विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून या आदेशान्वये या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com