CM शिंदेंना आरामाचा सल्ला; मंत्र्यांची यादी घेवून फडणवीस दिल्लीला रवाना

Devendra Fadnavis | Eknath Shinde | : यादी अंतिम झाल्यास संभाव्य मंत्र्यांना आज रात्रीपर्यंत फोन जाण्याची शक्यता
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारला अखेर मुहूर्त लागला असून उद्या (५ ऑगस्ट) रोजी संध्याकाळी ६ वाजता राजभवनात शपथविधी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजपच्या (BJP) सात आणि शिंदे (Eknath Shinde Group) गटातील पाच अशा १२ मंत्र्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोण शपथ घेणार, याची उत्सुकता सत्ताधारी पक्षांच्या सर्वच आमदारांमध्ये आहे. (Maharashtra Cabinet expansion)

मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांच्या याच नावांवर अंतिम हात फिरविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. आजचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करुन फडणवीस दिल्लीला गेले आहेत. ते या भेटीत भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या भेटीत नेमकी कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सततच्या दौऱ्यामुळे थकवा जाणवत असल्याने आज आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे केवळ फडणवीस हे एकटेच दिल्लीला रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे देखील गत आठवड्यात औरंगाबाद दौऱ्यावर असताना अचानक दिल्लीला जावून आले होते. त्यावेळी रात्री ८ वाजता जावून ते सकाळी ६ वाजता पुन्हा औरंगाबादच्या उर्वरित दौऱ्यासाठी माघारी आले होते.

न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता होणार विस्तार?

बंडखोर सोळा आमदारांची अपात्रता, सत्तास्थापनेतील राज्यपालांची भूमिका, शिवसेनेच्या चिन्हाचा वाद या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेत आहे. या सर्व प्रकरणांवर काल आणि आज सुनावणी झाली. मात्र या सुनावणीत कोणताही निर्णय झालेला नसून सोमवार (८ ऑगस्ट) रोजी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचे की नाही यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाची वाट न पाहता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in