
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'सामना' या वृत्तपत्रासाठी दिलेली बहुचर्चित मुलाखत आज सकाळी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पक्षातील बंडखोरीवर सविस्तर भाष्य केले आहे. तसेच हे बंडखोर म्हणजे राजकारणात यांना ज्यांनी जन्म दिला त्यांनाच अर्थात शिवसेनेलाच गिळायला निघालेली औलाद आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर अक्षरशः सडकून टीका केली.
ठाकरे म्हणाले, “५६ वर्षात अनेकदा शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. पण भाजपाला शिवसेना का संपवायची आहे असं आपल्याला वाटतं का?” असा सवाल राऊत यांनी विचारला. “गेल्या ५६ वर्षां शिवसेना संपवायचे अनेक प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी शिवसेना तितक्याच जोमाने आणि तेजाने उभी राहिली. पण आता ते जे काही करत आहे ते सर्व करण्यामागे त्यांना शिवसेना संपवायची आहे. आता त्यांनी जी तोडफोड केली आहे, ती करुनही त्यांचं समाधान होत नाही म्हणून त्यांना शिवसेना संपवायची आहे. तुमच्या आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक काय आहे, हे विाचारणाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की, त्यांना हिंदूत्त्वात भागीदार नको आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्त्व मजबूत होण्यासाठी, हिंदूत्त्वासाठी राजकारण केलं. पण ते राजकारण करण्यासाठी हिंदूत्त्व वापरत आहेत. हा त्यांच्या आणि आमच्या हिंदूत्त्वातला फरक आहे.
अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ठरलं होतं, तेव्हाच जर हे केलं असतं तर सन्मानानं झालं असतं. पण भाजपला ठाकरे-शिवसेना वेगळी करायची आहे. भाजपचा शिवसेना संपवण्याचा कट आहे, असा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना तळपती तलवार आहे. संघर्षासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आताही बंडखोरांना वापरुन त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. विश्वास ठेवला त्यांनीच घात केला, पण आता तुम्हाला विश्वासघाताचा शिक्का पुसता येणार नाही. अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान तब्बल ३६ मिनिटे चाललेल्या ठाकरे यांच्या या मुलाखतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी तीनच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची आजची मुलाखत ही फिक्स मॅचसारखी होती. पण मी फिक्स मॅच बघत नाही. मी केवळ लाईव्ह मॅच बघत असतो. त्यामुळे फिक्स मॅचवर काय प्रतिक्रिया द्यायची? जेव्हा पुढे काही येईल तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे यांच्या मुलाखतीवर अधिक भाष्य टाळले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.