
Maharashtra Congress News : गेल्यावर्षी सात सप्टेंबरला कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारत जोडो' पदयात्रा देशात काढली. त्यात त्यांनी 'डरो मत,' 'नफरत छोडो, भारत जोडो'चा संदेश देत कन्याकुमारी ते काश्मीर असा चार हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. या यात्रेचा पहिला वर्धापनदिन कॉंग्रेस महाराष्ट्रात दणक्यात साजरा करणार आहे.
भारत जोडोच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील सर्व जिल्ह्यात सायंकाळी कॉंग्रेस पुन्हा ही यात्रा काढणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून तिची सुरवात केली जाईल. त्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. त्याआधी दुपारी सर्व जिल्ह्यात काँग्रेसचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेची कशी लूट केली याचा पर्दाफाश करणार आहेत.
'भारत जोडो' यात्रेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांना जिल्हावार जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) नागपूर, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नगरमध्ये विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अकोला येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पुणे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाण्यात प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, नाशिकमध्ये CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते माजी मंत्री सतेज पाटील, संभाजीनगरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, जळगावमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
देशातील जनता महागाईने त्रस्त आहे, सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले असतानाही मोदी सरकारला, मात्र महागाई दिसत नाही. सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिले होते. पण, मागील नऊ वर्षात मोदी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवू शकले नाही. नऊ वर्ष जनतेची लूट केल्यानंतर आता त्यांना जनतेची आठवण झाली असून गॅस सिलिंडरची किंमत दोनशे रुपयांनी कमी केल्याचा भाजप (BJP) व मोदी सरकार मोठा गाजावाजी करत आहे. परंतु ते खरे नाही. मोदी सरकारने नऊ वर्षात जनतेला कसे लुटले याची पोलखोल उद्या वरील नेते त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात करणार आहेत.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.