नाना पटोलेंनी महाविकास आघाडीत पेटवली बत्ती.. वणवा पेटणार की विझणार?

काॅंग्रेस स्वबळावर आगामी निवडणुका लढणार असल्याचा आदेशच नाना पटोले (Nana Patole) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
नाना पटोलेंनी महाविकास आघाडीत पेटवली बत्ती.. वणवा पेटणार की विझणार?
Nana PatoleSarkarnama

मुंबई : राज्यात सत्तेवर असलेल्या काॅंग्रेसने आता महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांची झोप उडवली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. आक्रमक म्हणून आपली ओळख कायम राहावी यासाठी प्रयत्न करणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळावर आगामी निवडणुका लढविण्याचा आदेश देणारा एक खलिता आपल्या जिल्हा कमिट्यांना पाठविला आहे. या पत्रामुळे त्यांनी काॅंग्रेसमधील इतर नेत्यांनाही चकीत केले आहे.

महाविकास आघाडीतील नेते स्थानिक पातळीवर चर्चा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करतील, असे बोलले जात होते. ही शक्यताच पटोले यांच्या पत्रामुळे संपुष्टात आली आहे. पटोले यांचा बाणा हा प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत टिकणार का, याची आता उत्सुकता आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील बहुतांश नेते स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ, असे जाहीरपणे सांगत महाविकास आघाडीतील इतर पक्षांबाबत फार कटुतेने किंवा आक्रमकतेने बोलत नाहीत. पण नानांनी पूर्ण वेगळा पवित्रा घेतला आहे.

Nana Patole
महाराष्ट्रातही राजस्थान पॅटर्नचे संकेत; पटोलेंचे मंत्रिमंडळात आगमन होणार?

ठाणे, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर यासह अनेक पालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत राज्याप्रमाणे महाविकास आघाडी करीत निवडणुका लढविण्यात येतील, असे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात येत होते. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लसीकरण मोहिमेवरून वाद-विवाद आणि संघर्ष सुरू झाला. ठाण्यात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महापलिका निवडणुकीत आघाडीचे संकेत देण्यात आले होते. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तशीच शक्यता वर्तवली होती. मात्र या साऱ्या प्रयत्नांवर नाना पटोलेंच्या या पत्रामुळे पाणी पडले आहे.

Nana Patole
नाना पटोलेंनी मानले भाजपचे आभार

दुसरीकडे काॅंग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते हे भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचे संकेत देत होते. हे संकेतही आता धुळीस मिळाले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला ज्या ठिकाणावरून खाली आणायचे असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत असू, असे प्रतिपादन केले होते. असे असताना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा आदेश दिल्याने काँग्रेसचे ‘एकला चला रे’ चे धोरण स्पष्ट केले.

Nana Patole
`हमीभावाचा `फूल प्रुफ` कायदा येईपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही`

पत्रात काय म्हटले आहे?

शहराध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात पटोले यांनी, कोणत्याही स्वरूपाची तडजोड न करता स्वबळावर लढा. त्यानुसार तेथील स्थितीचा आढावा घेऊन स्वबळाची तयारी करा, असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील अहवाल तयार करून तो प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय घेऊ नका, असा स्पष्ट आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in