काॅंग्रेसचे वेगळचं..... मुंबईत शिवसेनेसोबत एकत्र न लढण्याचा सूर! - congress is not in mood to join alliance with congress in upcoming BMC election | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेसचे वेगळचं..... मुंबईत शिवसेनेसोबत एकत्र न लढण्याचा सूर!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

मुंबई कॉंग्रेसचे सध्या एकनाथ गायकवाड हे हंगामी अध्यक्ष आहेत. त्यांच्या जागी कायमस्वरूपी अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी गेल्या चार-सहा महिन्यांपासून कॉंग्रेसच्या बैठका झाल्या आहेत.

मुंबई : मुंबई कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त व्हावा म्हणून मागील चार-सहा महिन्यांपासून कॉंग्रेसमध्ये जोरबैठका सुरू आहेत. अध्यक्ष निवडला जात नसताना पदाधिकाऱ्यांकडून मात्र आगामी महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी केली जात आहे. आता बिहार निवडणुकीत बसलेल्या फटक्‍यामुळे ही नियुक्ती लांबणीवर पडण्याची शक्‍यता असताना पदाधिकाऱ्यांनी मात्र पालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत.

भाजपने मुंबई पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर यांच्याकडे दिल्यानंतर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महाआघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही तीनही पक्ष पालिका निवडणूक एकत्र लढवतील, अशी चर्चा आहे. मात्र काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पालिकेत स्वतंत्र लढण्याचा मूड असल्याचे स्पष्ट केले आहे. 

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी मंगळवारी माजी विधानसभा आणि विधान परिषद सदस्य, तसेच मुंबई कॉंग्रेसच्या विविध युनिटच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली होती. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा बैठका घेतल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. त्याचबरोबर आगामी पालिका निवडणुकाही स्वतंत्र लढण्याची मागणी केली आहे. मुंबई कॉंग्रेसचे सध्या एकनाथ गायकवाड हे हंगामी अध्यक्ष आहेत. त्यांच्या जागी कायमस्वरूपी अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी गेल्या चार-सहा महिन्यांपासून कॉंग्रेसच्या बैठका झाल्या आहेत. ऑक्‍टोबरच्या अखेरपर्यंत त्यानंतर दिवाळीपूर्वी मुंबई कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्‍यता होती; मात्र अद्याप नाव निश्‍चित झालेले नाही.

निवडणुकीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे!
पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांचीही भेट पाटील यांनी मंगळवारी घेतली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे मत व्यक्त केले आहे. यापूर्वी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्तेत असतानाही पालिका निवडणूक स्वतंत्र लढलो आहोत. राज्यात महाविकास आघाडी असली तरी पालिकेत आम्ही विरोधी पक्ष आहोत. पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे रवी राजा यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख