
Congress : शिवसेनेत (Shivsena) बंड झाल्यानंतर आता काँग्रेस (Congress) सावध झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या विरोधात सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी आणि 4 जुलै रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्तावावेळी गैरहजर राहणाऱ्या काँग्रेसच्या अकरा आमदारांची चौकशी करण्याचे आदेश कॅाग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी कॅाग्रेस नेते मोहन प्रकाश आज (ता.8 जुलै) दिले आहे
वेणुगोपाल यांनी मोहन प्रकाश यांना महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडीची चौकशी करून याबाबतचा आवहाल तत्काळ सादर करण्याचा आदेश दिला आहे. मोहन प्रकाश यांना ही चौकशीसाठी खास नेमण्यात आले आहे. कारण मोहन प्रकाश यांनी या आधी महाराष्ट्र प्रभारी म्हणून काम केले आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले होते. यामुळे क्रॅाग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे कॅाग्रेसवर मोठी नामुष्की आली होती.
शिवसेनेचे नेते आणि आता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत सुमारे 40 शिवसेनेच्या आमदारांच्या साथीने आणि भाजपच्या समर्थनाने राज्यात नवं सरकार स्थापन केले आहे. या सरकारच्या विश्वासदर्शक ठरवावेळीही कॅाग्रेसचे अकरा आमदार अनुपस्थित होते. यामुळे कॅाग्रेसच्या हायकमांडने गांभीर्याने याप्रकरणी लक्ष घालत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केली होती. चव्हाण यांनी यासंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे हा सारा तपशील मांडला होता. विधानपरिषद निवडणुकीत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
हंडोरेंना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या आमदारांनीही मतदान केले होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत वरकरणी काँग्रेसची तीन मतं फुटल्याचे दिसत असले तरी काँग्रेसची प्रत्यक्षात ७ मते फुटल्याचे समोर आले होते. ही अत्यंत गंभीर बाब असून क्रॉस व्होटिंग करणाऱ्या या ७ आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील अनेक कॅाग्रेस नेत्यांनी केली होती. यावर एच. के. पाटील हे दिल्लीत जाऊन हायकमांडकडे अहवाल दिल्याची माहिती आहे. यानंतर सोनिया गांधी यांनी कठोर पाऊल उचलत चौकशीचा आदेश दिल्याचे समजते.
दरम्यान, विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यावर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते याठिकाणी उशीरा पोहोचल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करताना महाविकास आघाडीची केवळ ९९ मतंच नोंदवली गेली. इतक्या महत्त्वाच्या क्षणीही काँग्रेसचे प्रमुख नेते निष्काळजीपणे वागल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला जात आहे. गैरहजर राहणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांचाही समावेश होता.आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सगळ्याची दखल घेत काय कारवाई करतात हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.