
Vidhan Parishad Elelction latest news
मुंबई : राज्यसभेच्या निकालाने विधान परिषदेचेही गणित बिघडून राजकीय घात होण्याच्या भीतीने शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) काँग्रेसही (Congress) धास्तावली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट भाजपला टक्कर देण्याच्या हिशेबाने काँग्रेसने दिलेल्या दोघांपैकी एका उमेदवाराला निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत दोन जागा निवडून आणण्यापुरते संख्याबळ नसल्याने काँग्रेसला आता माजी चंद्रकांत हंडोरे की मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यापैकी एकाच नावावर शिक्कामोर्तब करावा लागेल. त्यामुळे हंडोरे की भाई आपला उमेदवार मागे घेतील याची उत्सुकता आहे.
विधानसभेत काँग्रेसकडे ४४ आमदार असून, विधान परिषदेच्या एका जागेसाठी २७ मतांची गरज आहे. दुसरी जागा जिंकण्यासाठी आणखी दहा मतांची बेगमी करावी लागणार आहे. मात्र, तेवढी क्षमता काँग्रेसकडे आजघडीला नाही. तरीही, काँग्रेसने दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतील सहावी जागा शिवसेनेला एकतर्फी वाटत असतानाच भाजप नेत्यांनी आघाडीच्या साथीतील नऊ आमदारांना फोडले आणि तिसराही खासदार निवडून आणला. त्यामुळे पुढच्या काळातही ठाकरे सरकारला जेरीस आणण्यासाठी भाजप आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गनिमा कावा करीत राहणार असल्याचे संकेत आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडील दणका देण्याची भाजपची तयारी असल्याचे बोलले जात आहे. आधीच खिळखिळी झालेली काँग्रेस सध्या तरी भाजपच्या डावात टिकण्याची शक्यता नसल्याने त्यांना आता वेळीच सावध होऊन विधान परिषदेचे गणित बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गटातटातच अडकलेल्या काँग्रेसमध्ये भाई किंवा हंडोरेंना यापैकी एकाला निवडणूक रिंगणात ठेवावे लागेल. त्यावरून या पक्षात वाद होण्याची शक्यता आहे.
दोन्ही उमेदवार कायम राहिल्यास भाई आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात फाइट होईल. लाड हेही काही कमी ताकदीचे नाहीत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी बारा उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात भाजकडून ६, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत. दोन जागा निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे मते आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात; तरीही भाजपकडून धोका नसेल, असे नाही. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी (ता. १३ जूनपर्यंत) आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.