मुंबई : सध्या कार आणि सरकार दोन्ही मी चालवत आहे. यात खड्डे आणि अडचणी येत आहेत, परंतु त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील बिघाडाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.
राज्याच्या राजकारणचे स्टेअरिंग कुणाच्या हातात, यावर मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारे एक ट्विट केले होते. या ट्विटपासून या चर्चेने जोर पकडला होता. या ट्विटमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा गाडीतला फोटो टाकला होता. या फोटोमध्ये अजित पवारांच्या हातात स्टेअरिंग होते.
आता एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरू आहे. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहोत. सर्वजण मिळून काम करीत आहेत.
मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीतील घटक पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. यात सर्वांत मोठा मुद्दा औरंगाबादच्या नामांतराचा आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून काँग्रेसला टोला लगावण्यात आला होता. औरंगजेब प्रिय असेल, त्यांना साष्टांग दंडवत, असा टोला लगावण्यात आला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी या प्रकरणी भाजपसह शिवसेनेलाही लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, मागील पाच वर्षे सोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्तेत होते, तेव्हा त्यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?
Edited by Sanjay Jadhav

