अखेर मुख्यमंत्र्यांना अमित शहांची वेळ मिळाली; औरंगाबादवरुन रात्रीच दिल्ली गाठणार...

Eknath Shinde | वैजापूरमध्ये असतांनाच एकनाथ शिंदे यांना तातडीने दिल्लीत येण्याचा निरोप
Amit Saha, Eknath Shinde Latest News,
Amit Saha, Eknath Shinde Latest News,Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची वेळ मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच आज रात्री ते तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. परंतु रात्रीच दिल्ली दौरा आटोपून ते उद्या सकाळी पुन्हा औरंगाबादेत येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या तातडीच्या दिल्ली दौऱ्यात शहा-शिंदे यांच्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावनीबद्दलही या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी मध्यरात्री नाशिक, मालेगाव दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून ते वैजापूर मार्गे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आले. शिंदे गटातील आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रम व सत्काराला हजेरी लावल्यानंतर ते सायंकाळी औरंगाबादेत मुक्कामी येणार होते. परंतु वैजापूरमध्ये असतांनाच त्यांना तातडीने दिल्लीत येण्याचा निरोप मिळाला. त्यानंतर रात्री आठ वाजता मुख्यमंत्री वैजापूरातून थेट चिकलठाणा विमानतळावर रवाना झाले आणि तिथून सव्वा आठ वाजता ते दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

एक महिना उलटल्यानंतरही शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यावरून विरोधक सरकारवर चोहोबाजूने टीका करत आहेत. अमित शहांच्या मान्यतेशिवाय हा विस्तार होणार नाही. मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे शिंदे आणि फडणवीस सांगत असले तरी अद्याप त्यावर भाजप श्रेष्ठींची चर्चा न झाल्याने सारेच गाडे अडले आहे. त्यातून शिंदे गटातही अस्वस्थता आहे.

अशातच राज्यातील विविध भागांमध्ये पूर आणि त्यामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी देखील राज्यातील काही भागात पूराचे संकट असतांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सत्कार आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याची टीका केली होती. शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर देखील १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आणि दुसरीकडे लांबत चाललेला मंत्रीमंडळ विस्तार अशा कोंडीत शिंदे सरकार सापडले आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण बुधवारी संध्याकाळी अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अमित शहा (Amit Shah) यांची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. त्यानंतर ही वेळ आज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in