कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही; पण...

राज्यात आता नवीन निर्बंध राज्य सरकारने घातले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : देशामध्ये कोरोनाचा (Corona) कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात आता नवीन निर्बंध राज्य सरकारने घातले आहेत. त्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहे. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊले उचलत त्या रोखल्या. मात्र आता आपले रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray
आमदार सिद्धार्थ शिरोळेंवर विमानतळासंदर्भात भाजप देणार मोठी जबाबदारी!

मी गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय, राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' आणि 'मिशन बिगीन' अगेनच्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या केल्या आणि अंमलात आणल्या. आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होते आणि आहेत. ते नियम पाळतात सुद्धा पण काही मूठभर लोकांच्यानियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे व बेजबाबदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे, लवकर या विषाणूच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहे हे लक्षात घ्या.

आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या याच वेगाने वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावे लागून ऑक्सिजनची मागणी देखील वाढू शकते. अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळे आजारी पडलेले दिसत आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. आपल्याकडे साधन सामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षात आपले सुविधांमध्ये वाढ केली आहे. मात्र, डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळे समस्या निर्माण झाली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे माझे अतिशय कळकळीचे आव्हाहन आहे की नियम पाळा, सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असे समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो. या सगळ्यामध्ये लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसे झालेले नाही, तिथे रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray
विनोद तावडेंची परफेक्ट खेळी : बहुमत नसताना मिळविले महापौरपद

काय आहेत निर्बंध

रविवार रात्रीपासून (ता. 9) हे नियम लागू केले जाणार आहेत. रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सलून 50% क्षमतेने रात्री १० पर्यंत चालू ठेवता येणार आहेत. जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्यूटी पार्लर, पर्यटन केंद्र , किल्ले, म्युजियम बंद करण्यात येणार आहे. शॉपिंग मॉल्स, मार्केट मध्ये 50% क्षमतेने उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. मॅाल्समध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असणार आहे. रात्री दहा नंतर ते बंद असणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

हॉटेल 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. मात्र, रात्री दहा वाजता ते बंद करावे लागणार आहे. नाट्यगृज सिनेमगृह 50% क्षमतेने सुरु राहणार आहेत. कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच खासगी कार्यालये ५० टक्के शमतेने सुरु ठेवता येणार आहेत. कार्यालयात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधणकारक आहे.

-दहावी, बारावीच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार

-दोन्ही डोस झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता येणार

-लग्न समारंभात फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.

- अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.

-सार्वजनीक कार्यक्रमांना ५० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com