उद्धव ठाकरे 'धर्मवीर' चा तो भाग न पाहताच उठले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या मोजक्या नेत्यांसह रविवारी सायंकाळी धर्मवीर चित्रपट पाहिला
Uddhav Thackeray, Anand Dighe
Uddhav Thackeray, Anand Dighesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते, धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) हे (२००१ मध्ये) सिंघानिया हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत असतानाही, तेव्हाचे शिवसेना (Shivsena) नेते, आजघडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दिघे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले नव्हते. त्याच ठाकरेंनी धर्मवीर (मुक्काम पोस्ट ठाणे) या चित्रपटातील दिघेंचा अपघात, त्यावरच्या उपचाराचा प्रसंग पाहणेही रविवारी टाळले.

ठाणेकरांसाठी दैवत ठरलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे शिवसेनेच्या मोजक्या नेत्यांसह रविवारी सायंकाळी चित्रपट पाहण्यास गेले. चित्रपटगृहाबाहेर ठाकरे यांचे स्वागत झाले. त्यानंतर ते चित्रपटगृहातून गेले आणि दिघेंच्या अपघाताचा प्रसंग पुढे येण्याआधीच ठाकरे तेथून बाहेर पडले. चित्रपटातही दिघेंचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानंतर उपचार आणि इतर काही बाबीचा समावेश आहे. अपघाताचा हा प्रसंग दिघेंच्या चाहत्यांसाठी धक्का ठरतो आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती घटना न पाहता, चित्रपट अर्धवट सोडला.

Uddhav Thackeray, Anand Dighe
सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्रजी, उद्धवजी आणि राज तुमचे जाहीर आभार!

चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी जिवंत केले. उत्तम भूमिका केली. कुठेच जाणवले नाही मी चित्रपट पाहतो आहे. सर्वांनी हा चित्रपट पहावा, असेही त्यांनी सांगितले. आयुष्य जगावं कसं हे आपण या चित्रपटातून शिकले पाहिजे. प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. त्यामुळे माता भगिनींचे रक्षण होईल. एक शिवसैनिक कसा असावा, यासाठी चित्रपट पहावा. शिवसैना प्रमुख आणि आनंद दिघे यांचे नाते अधिक घट्ट होते. सर्व शिवसैनिक हे आनंद दिघेंच्या मुशीत घडलेले आहे. माझ्या समोर अनेक घटना घटलेल्या आहेत. बाळासाहेबांचा विश्वास आनंद दिघे यांच्यावर होता. हे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले शेवटचा प्रसंग मी पाहू शकलो नाही. कारण त्यावेळी आमच्यावर तो आघात होता. व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गणेशोत्सवात गणेश मंडळांना भेटीनंतर २००१ मध्ये दिघे यांच्या वाहनाचा अपघात होऊन, त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. याचदरम्यान, शिवसेनेतील अनेक बडे नेते दिघे यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटत राहिले. त्यात तेव्हाचे विद्यार्थी सेनेचे नेते, आताचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तर दिघे यांची हॉस्पिटलमध्ये दोनदा भेट घेऊन विचारपूस केली होती.

त्यात आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणेही दिघेंच्या भेटीला गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे हे हॉस्पिटलकडे फिरकले नसल्याने तेव्हा आणि आताही भलत्याच चर्चा ऐकायला मिळतात. शेवटी उद्धव ठाकरे हे दिघेंचा मृत्यू झाल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये गेले. परंतु, दिघेंच्या हयातीत एवढा गंभीर प्रसंग ओढवूनही उद्धव ठाकरे उपचारादरम्यान एकदाही हॉस्पिटलमध्ये जाण्याची तसदी न घेतल्याचा मुद्दा आजही उकरून काढला जातो. त्यातही आता तर धर्मवीर चित्रपटातही दिघेंवरील उपचार न पाहताच ठाकरे चित्रपटगृहातून निघून गेले. त्यांच्यासोबतचे काही नेते मात्र चित्रपटगृहात बसून राहिले आणि दिघेंच्या जाण्याचे साक्षीदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in