सुधीरभाऊ, तुम्ही तर नटसम्राटच; मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजीने विधानसभा गाजवली - chief minister uddhav thackeray responds to governor speech | Politics Marathi News - Sarkarnama

सुधीरभाऊ, तुम्ही तर नटसम्राटच; मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजीने विधानसभा गाजवली

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. 

मुंबई : विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाला आज उत्तर दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी करीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले. त्यांचा रोख हा प्रामुख्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होता. 

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सर्वांनी काही ना काही विषय विधानसभेत मांडले आहेत. काहींनी प्रश्न विचारले आहेत. सर्वांची आताच उत्तर देणे शक्य होणार नाही .आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आमच्याकडे उत्तर आहे. सगळे सदस्य बोलून गेले आहेत, त्यातील काही विचारणारे हजर राहिले असते तर बरे झाले असते. 

सुधीर मुनंगटीवार यांचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, सुधीरभाऊ, मी केबिनमध्ये बसून विधानसभेचे कामकाज पाहत होतो. त्यावेळी अचानक मला भास झाला मी नटसम्राट पाहत आहे. मात्र, त्याचा शेवट मला असा केविलवाणा वाटला की, कुणी मला किंमत देता का किंमत? सुधीरभाऊ काय तुमचा वेश आणि आवेश होता. चंद्रकांतदादा आणि देवेंद्रजींनी काही वेळ असं वाटायला लागले की आपलं काय होणार. कलागुणांना वाव या क्षेत्रात मिळत नाही. सुधीरभाऊ कलाकार कुठे लपून राहत नाही. जिथे संधी मिळेत तिथे उचंबळून येत असतो कलाही जन्मजात असावी लागते. ती मारु नका अशीच जिवंत ठेवा.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राज्यपालांचे भाषण आपण सर्वांनी ऐकले. राज्यपालांना या भाषणाबद्दल धन्यवाद. त्यांनी निष्पक्षपातीपणाने सरकारची कारकिर्द मांडली. त्यांनी वस्तुस्थिती सगळ्यांसमोर ठेवली. अपेक्षित नसताना झालेले चांगले काम त्यांनी माडले. ते चांगले बोलले आणि मराठीत बोलले. काहींना त्यांचे हे मुद्दे पटणार नाहीत. कारण सरकार चांगले काम करतेय हेच त्यांना पटत नाही. 

शिवभोजन थाळी पाच रुपयांत आपण दिली. सुधीरभाऊंनी ती थाळी कोण खाणार, असा प्रश्न उपस्थित केला. मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. त्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे उल्लेख केला होता. सरकारने 80 कोटी लोकांनी अतिरिक्च पाच किलो धान्य दिल्याचे म्हटले होते. मागील आठ महिन्यांत अतिरिक्त धान्य मिळालेले हे सगळे गरीब आता श्रीमंत झाले का?  गरीबांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी इंधन गॅस दरवाढ असे तुम्ही म्हणता. अहो सुधीरभाऊ, एक गोष्ट सांगतो की आम्ही भरलेली थाळी देतोय अन् रिकामी थाळी वाजवत नाही. भरलेली की रिकामी थाळी हा या सरकारचा फरक आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख