
Mumbai : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोठं पाऊल उचलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबरोबरच सव्वा दोन लाख सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट असून गेल्या वर्षी ७५ हजार सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.
ज्यांना वीजेची जोडणी नाही त्यांना प्राधान्याने सौर कृषीपंप देण्याचे धोरण आहे. ज्यांच्याकडे वीजजोडणी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनाही सौर कृषीपंप देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय अर्थसंकल्पात घेतला असून विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे. त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक अशा विविध योजना शासन राबवित आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. यात प्रतिवर्ष प्रति शेतकरी ६ हजार रुपये अतिरिक्त राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
अवकाळी, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये वाटप केले आहे. सिंचनाच्या २८ योजना मंजूर केल्या आहेत. त्यातून ५ लाख हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कर्जवसुलीसाठी छोट्या शेतकऱ्यांच्या मागे लागू नका, त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना जिल्हा बँकांना देण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
(Edited By- Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.