
Mumbai : ''दाऊदच्या बहिणीला ज्यांनी चेक दिला त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला. तरी देखील त्यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला नाही. त्यामुळे बरं झालं अजित पवार यांच्यासोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. अन्यथा महाराष्ट्र द्रोह झाला असता''.
''सत्ता गेल्यामुळे अजित पवार हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी मानसिकता आम्ही समजू शकतो. मासा जसा पाण्याविना तडफडतो, अशीच अवस्था त्यांची झाली आहे'', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या चहा-पानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, ''सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहे. आम्ही अनेक सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली. अनेक निर्णय घेतले. राज्यातील अनेक प्रकल्पाला आम्ही चालना देण्याचे काम करत आहोत. 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना आम्ही राज्यात राबवत आहोत'', असं ते म्हणाले.
''माझ्यावर आता निष्ठा बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना सोडल्यावर काय होतं? हे सांगता. पण आम्ही शिवसेनाच आहोत. अजित पवार कधीपासून कडवट शिवसैनिक झाले. अजित पवारांसारखी निष्ठा मी बदलली नाही. एकदा फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा मविआकडून शपथ घेतली. त्यामुळे अजित पवारांनी आरोप करताना थोडे तारतम्य बाळगले पाहीजे. लोकशाहीत बहुमताला महत्व असतं'', असा घणाघात शिंदेंनी केला.
''आम्ही विरोधकांना सभागृहात उत्तर देऊ. तसेच आमच्या कामातून उत्तर देऊ. तुमचे दोन-दोन मंत्री तुरुंगात गेले. पण महाविकास आघाडी सरकारने त्यांचे राजीनामे घेतले नाही. त्यामुळे आम्हाला घटनाबाह्य म्हणण्याआधी तुमच्या पक्षांनी काय केलं? हे पाहा. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुम्ही गिरीश महाजन आणि फडणवीसांना आत टाकण्याची चर्चा करत होता'', असंही ते यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.