अन्यथा परमबीरसिंहांवर कारवाई करावी लागेल! चांदीवाल समितीची तंबी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह मुंबईत दाखल झाल्यापासून त्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.
Param Bir Singh
Param Bir Singh Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीने परमबीरसिंह यांना कारवाईची तंबी देत हजर होण्याचा आदेश दिला आहे.

बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला आज चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी परमबीरसिंह हे समितीसमोर हजर झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी समितीने परमबीरसिंह यांच्या वकिलांना त्यांचा ठावठिकाणा विचारला. यावर ते मुंबईत आहेत, अशी माहिती समितीला देण्यात आली. परमबीरसिंह यांना समितीसमोर हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. ते हजर न राहिल्यास त्यांच्या विरोधातील जामीनपात्र अटक वॉरंटची कार्यवाही करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. ते चौकशीसाठी थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी आलो आहे. आत्ताच मी काही बोलणार नाही. मी आता न्यायालयातच बोलेन, असे परमबीरसिंह यांनी म्हटले आहे.

Param Bir Singh
बापरे! पूर्ण लसीकरण झालेल्या वैद्यकीयच्या 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

परमबीरसिंहांच्या वकिलांनी नुकतीच आयोगासमोर हजेरी लावली. त्यावेळी वकील म्हणाले होते की, परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले होते. त्यामुळे समितीसमोर साक्षीदार म्हणून ते हजर होण्यास कोणतेही महत्व नाही. त्यांनी काही अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप करण्यात आले होते. याबाबत परमबीरसिंहांना थेटपणे कोणतीही माहिती नव्हती. ते आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर झाले तरी कायद्यानुसार त्याला काही महत्व असणार नाही. कारण ते सांगतील ती माहिती इतरांनी त्यांना सांगितलेली असेल.

Param Bir Singh
खुर्शीद यांच्या पुस्तकावर उच्च न्यायालय म्हणालं, पटत नसेल तर वाचू नका!

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com