अनिल देशमुखांचा मुलगा अन् सून सीबीआयच्या जाळ्यात? सकाळीच गाठलं घर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ठावठिकाणा तपास यंत्रणांना लागत नाही.
अनिल देशमुखांचा मुलगा अन् सून सीबीआयच्या जाळ्यात? सकाळीच गाठलं घर
Anil Deshmukh

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ठावठिकाणा तपास यंत्रणांना लागत नाही. पण सीबीआयकडून जोमाने तपास सुरू ठेवण्यात आला आहे. सीबीआयने सोमवारी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापा टाकला. देशमुखांच्या घरावरील सीबीआयचा हा दुसरा छापा आहे. देशमुखांच्या मुलाला व सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. पण ते दोघेही घरी नसल्याचे समजते.

सीबीआय अधिकाऱ्यांचं पथक सकाळी आठ वाजताच देशमुखांच्या घरी धडकलं आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यामार्फत 100 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप देशमुखांवर आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

Anil Deshmukh
आता भाजपमधूनच विरोधी सूर; प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं!

त्यानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी करून देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सक्तवसूली संचालनालयानेही देशमुखांची चौकशी सुरू केली. त्यांच्या दोन सचिवांना अटकही करण्यात आले असून सध्या ते कोठडीत आहेत. देशमुख यांचा मात्र सध्या ठावठिकाणा लागत नाही. ईडीसह सीबीआयही त्यांच्या मागावर आहे. देशमुख ईडीच्या चौकशीला एकदाही सामोरे गेलेले नाहीत. न्यायालयानंही त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.

त्यातच आता पुन्हा एकदा सीबीआय सक्रीय झाली आहे. देशमुखांच्या नागपूर येथील घरावर सोमवारी सकाळी छापा टाकण्यात आला आहे. अज्ञातवासात गेल्यापासून अनिल देशमुख अद्यापही तपास यंत्रणांच्या समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या भोवती कारवाईचा ससेमिरा लागलेला आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा पडलेला हा दुसरा छापा आहे.

Anil Deshmukh
आरोग्यमंत्री म्हणतात, आता महिलांना अविवाहित राहायला आवडतं!

यापूर्वी त्यांचे घर वर्धा रोड वरील हॉटेल, काटोल रोड वरील शिक्षण संस्था आणि त्यांचे पुत्र सलील यांच्या मित्रांवर सीबीआयने छापे घातलेले आहेत. अनिल देशमुख तपास यंत्रणांच्या समोर येत नसल्यामुळे त्यांचा मुलगा आणि सून यांना अटक केल्यानंतर तरी ते समोर येतील ही अपेक्षा ठेऊनच सीबीआयने त्यांचे पुत्र सलील आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरंट बजावला असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

आज सीबीआय अधिकाऱ्यांची कारवाई सुरू असताना अनिल देशमुख यांच्या शेजारीच राहत असलेल्या सलील देशमुख यांच्या घरून माहिती घेतली असता, ते दोघेही घरी नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता सलील देशमुख आणि त्यांच्या पत्नी कुठे असतील, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Stories

No stories found.