राज्यसभा निवडणूक : या नियमामुळे राष्ट्रवादीची दोन मते धोक्यात; 'मविआ'चे टेन्शन वाढले...

NCP | Rajya Sabha Election : सर्व पक्षांना स्वपक्षाच्या आमदारांचे एक-एक मतही महत्वाचे
राज्यसभा निवडणूक : या नियमामुळे राष्ट्रवादीची दोन मते धोक्यात; 'मविआ'चे टेन्शन वाढले...
Anil Deshmukh-Maliksarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात अखेर राज्यसभा निवडणूक (Rajya sabha Election) होणार हे निश्चित झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने बिनविरोधची २४ वर्षांची परंपरा मोडीत काढत ही निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. (Rajya sabha Election latest update)

अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढले असतानाच सर्व पक्षांना स्वपक्षाच्या आमदारांचे एक-एक मतही महत्वाचे बनले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मत धोक्यात आली आहेत. कारण राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आजी-माजी मंत्री आणि आमदार सध्या तुरुंगात आहेत. या दोघांनाही मतदान करता येणार की नाही याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या नियम क्रमांक ६२ (५) नुसार जे आमदार तुरुंगात शिक्षा भोगत असतील, किंवा त्यांच्याविरोधातील सुनावणी न्यायप्रविष्ट असेल आणि त्यावेळी ते कारागृहात असतील अथवा संबंधित आमदार पोलिस कोठडीत असताना त्यांना कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मात्र न्यायालयाने परवानगी दिल्यास मतदान करता येत असल्याचेही काही घटनांमध्ये दिसून आले आहे.

मात्र काल मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मलिक आणि देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी राष्ट्रवादी जोमाने कामाला लागाली असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, मलिक आणि देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी न्यायालयात दाद मागण्याची तयारी करण्यात आली आहे. मागच्या काळातही अशा काही घटना घडलेल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे तत्कालीन आमदार रमेश कदम आणि छगन भुजबळ हे मतदानासाठी विधीमंडळात आले होते, त्यामुळे मलिक आणि देशमुखांच्या मतदानासाठी आम्ही मोठ्या कसोशीने कामाला लागलो आहोत.

याठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे अजित पवार सांगत असलेली निवडणूक ही राष्ट्रपती पदाची निवडणूक होती आणि ती २०१७ मध्ये झाली होती. मात्र २७ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार की नाही याबद्दल कायदेशीर पेच निर्माण होवू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in