बिल्डर अविनाश भोसलेंना १० दिवसांची CBI कोठडी; कारवाई योग्य असल्याचेही निरीक्षण

Avinash Bhosale | CBI : अविनाश भोसले यांना मोठा धक्का
Avinash Bosale
Avinash BosaleSarkarnama

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने ८ जूनपर्यंत सीबीआय (CBI) कोठडीत रवानगी केली आहे. शिवाय सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसले यांचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. येस बँक-डीएचएफएल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी २६ मे रोजी रात्री उशिरा त्यांना सीबीआयने अटक केली होती. बँकेने लोन दिलेल्या काही प्रकल्पात भोसले यांनी सल्ला दिल्याचे आणि त्याचे पैसे भोसलेंच्या खात्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

दरम्यान ३० एप्रिल रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता. तसेच सक्त वसुली संचालनालयानेही त्यांना गेल्या वर्षी दणका दिला होता. त्यांची ४०.३४ कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिंडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली होती.

त्यानंतर २६ मे रोजी सीबीआयने भोसले यांना अटक केली होती आणि २७ मे रोजी त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. तेव्हा सीबीआयने भोसले यांच्या १० दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसले यांनी रीमांडला विरोध केला होता. त्यावर न्यायालयाने भोसलेंच्या रीमांडला विरोध करत दाखल अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआयला सोमवारपर्यंतची मुदत दिली होती.

तोपर्यंत न्यायालयाने भोसले यांना सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काल पुन्हा भोसले यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी भोसले यांच्या रिमांडवरील युक्तिवाद पूर्ण होवून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे त्यांना कालची रात्रही सीबीआय विश्रामगृहातच काढावी लागली होती. अखेरीस आज या न्यायालयाने भोसले यांची १० दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी केली असून सीबीआयची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने केला आहे.

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता.

भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधखाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील भोसलेनगर व डेक्कन जिमखाना परिसरात त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान चीजवस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com