शिक्षकांवर आता मोठी जबाबदारी...दंड ठोठावण्याचेही मिळणार अधिकार! - bmc teachers will soon collect fine from without mask citizens in mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्षकांवर आता मोठी जबाबदारी...दंड ठोठावण्याचेही मिळणार अधिकार!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.  
 

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू लागला आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांवर मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी पालिका शिक्षकांवर सोपवली आहे. 

महापालिका आयुक्त चहल यांनी सर्व अधिकाऱ्यांची यासंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली. मास्क न घातला फिरणारे नागरिक आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले दिले आहेत. सध्या रोज सरासरी 12 हजार 500 जणांवर कारवाई होत आहे. ही संख्या दुप्पट म्हणजेच 25 हजारांपर्यंत वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी 'क्‍लिन अप मार्शल'ची संख्या दुप्पट म्हणजेच 2 हजार 400 वरून 4 हजार 800 करण्याचे निर्देशही देण्यात आले आले. पोलिसांनाही दंड करण्याचे अधिकार देण्यात आले असून, यात आता मार्शल म्हणून शिक्षकांची भर पडली आहे. 

महापालिका इमारती, कार्यालये तसेच रुग्णालयांत मास्क न घालता येणाऱ्यांवर शिक्षकांना  कारवाई करता येणार आहे. येत्या सोमवारपासून (ता.22) ही मोहीम सुरू होणार आहे. तसेच, प्रार्थनास्थळी येणाऱ्यांचे समुपदेशनही करण्याची जबाबदारी येत्या काळात शिक्षकांवर सोपविण्यात येईल. त्यामुळे शिक्षकांना आता घरून काम बंद करावे लागणार असून, कामावर हजर राहावे लागणार आहे. 

मास्क घालण्याचा नियम मुंबईत मोठ्या प्रमाणात पाळला जात नसल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शिक्षकांनीही पालिका संकुलांमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करावयाचा आहे. याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

शिक्षिकांनाही प्रार्थनास्थळी मास्क न घालणाऱ्यांना दंड करण्याची जबाबदारी देण्याची देण्यात येणार आहे. या शिक्षिका नागरिकांचे समुपदेशनही करतील. त्यामुळे आता त्यांनाही कामावर रुजू व्हावे लागणार आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

कोरोना संकटाच्या काळात शिक्षकांना इतरही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. कोरोनाबाबतच्या बातम्यांचे संकलन, विभाग स्तरावरील नियोजन अशा जबाबदाऱ्या शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. कुर्ला येथील काही शिक्षकांनी या कामात सहभाग नोंदवला नव्हता. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख