
Rajyasabha Election latest news
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. तर शिवसेनेने (Shivsena) कोल्हापूर मधून संजय पवार यांना उमेदवारी दिली.असे असताना आता भाजपनेही (BJP) राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. यावर अंतिम निर्णय झालेला नसला तरी त्याचे सुतोवाच भाजपकडून करण्यात आले. भाजपच्या या खेळीमुळे मात्र शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या जागेसाठी भाजप कोणाची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 'राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार देण्याबाबत पक्षाने सध्या तरी कोणता निर्णय घेतला नाही. पण भाजप कोणतीही निवडणूक हरण्यासाठी लढत नाही. आम्हाला अंदाज आला की आम्ही विचार करू. सध्या भाजपकडे ३१ मते आहेत. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे कोटा ४१वर आला आहे. अशा वेळी आम्हाला १० मतेच कमी पडत आहे.
'देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाच वर्षांत कार्यकाळात अनेक मोठी कामे केली आहेत. त्यामुळे आम्हाला दहा मते सहज मिळू शकतात. घोडेबाजार न करताही आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो.' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. आता ही ३१ मते आणि इतर १० मते घेऊन तिसरी जागा लढावयची की नाही याचा निर्णय अजून घेतलेला नाही. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल', असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मे आहे. त्यामुळे याबाबत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. केंद्राने परवानगी दिली, तर आम्ही ही जागा निश्चितच जिंकून दाखवू, असा निर्धारही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपकडून राज्यसभेच्या दोन जागांपैकी पहिल्या जागेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे नाव निश्चित मानले जात असून, दुसऱ्या जागेसाठी भाजपमध्ये राम शिंदे, विनय सहस्रबुद्धे, अनिल बोंडे यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने जर तिसऱ्या जागेवर उमेदवार दिला तर शिवसेना कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.