तिकीट जाहीर होताच दरेकर सगळ्यात आधी पोचले चंद्रकांतदादांच्या भेटीला

भाजपकडून दरेकरांना पुन्हा विधान परिषदेवर संधी
तिकीट जाहीर होताच दरेकर सगळ्यात आधी पोचले चंद्रकांतदादांच्या भेटीला
Chandrakant Patil and Pravin Darekar Sarkarnama

मुंबई : भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकरांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. यानंतर दरेकरांनी तातडीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. (Legislative Council Election News)

विधान परिषदेत प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) भाजपची (BJP) बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. याचबरोबर ते महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करीत असतात. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेला उघडं पाडण्याची जबाबदारी भाजपने दरेकरांवर सोपवली होती. मुंबई महापालिकेतील पोलखोल मोहिमेचे नेतृत्वही पक्षानं त्यांच्यावर सोपवलं होतं. आज विधान परिषदेचं तिकीट जाहीर होताच दरेकरांनी चंद्रकांत पाटील यांची विधानभवनावर भेट घेतली. दरेकरांनीच ट्विट करीत ही सदिच्छा भेट असल्याचं जाहीर केलं. यानंतर दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरला.

Chandrakant Patil and Pravin Darekar
शिवसेनेचं टेन्शन संपलं! अखेर समाजवादी पक्ष आला मदतीला धावून

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत होतं. पण दोघींनाही संधी देण्यात आलेली नाही. पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही संधी दिली आहे. दरेकर, लाड व शिंदे यांच्या नावांवर आधीच शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते. तिघेही नेते फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात.

Chandrakant Patil and Pravin Darekar
फडणवीसांनी एका 'ओसडी'ला विधानसभेवर पाठवलं अन् दुसऱ्याला आता विधान परिषदेची लॉटरी

परिषदेसाठी 9 जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, शिवसेना 56 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार आहेत. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in