नारायण राणे म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या सहभागाशिवाय असलं काही शक्यच नाही!

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची १५ दिवसांत चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.
bjp leader narayan rane criticizes chief minister uddhav thackeray
bjp leader narayan rane criticizes chief minister uddhav thackeray

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची १५ दिवसांत चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिला. त्यानंतर देशमुख यांनी तातडीने गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहभागाशिवाय असे प्रकार शक्य नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. 

नारायण राणे म्हणाले की,  न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी करुन अहवाल देण्याचे सीबीआयला आदेश दिल्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. त्यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. न्यायालयाने सांगण्याची वेळ येऊ द्यायला नको होती. अनिल देशमुखच काय तर एनआयए आणि सीबीआयकडून नावे येण्याची अनेकांना भीती आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. राज्याचे ते प्रमुख असून, त्यांच्या सहभागाशिवाय असे प्रकार शक्य नाहीत. मुख्यमंत्रीच या सर्वाला जबाबदार आहेत. 

महाराजांचे हे राज्य आज कुठे चाललयं. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिलाय आणि आणखी काही यात आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य चाललयं ते मग गप्प का? कोरोना वाढतोय, बेरोजगार वाढलाय, कडक निर्बंध आहेत. कुठेही महाराष्ट्राचा विकास दिसत नाही. उद्धव ठाकरे हे हतबल नाहीत तर त्यांची पात्रता किंवा गुणवत्ताही नाही. एकच सुरू आहे, माझ कुटुंब माझी जबाबदारी. यांचचं कुटुंब कोरोनाग्रस्त आहे, असेही राणे म्हणाले.  

या संपूर्ण प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे यांना होती. सचिन वाझेंचे गॉडफादर तेच आहेत. त्यांना दररोज ब्रीफिंग व्हायचे. सीबीआय आणि कोर्टावर माझा पूर्ण विश्वास आहे. सत्य नक्की बाहेर येईल. काँग्रेसला सरकारमध्ये अस्तित्व नसून, त्यांना दिल्लीची भिती आहे. सोनिया गांधीचा विरोध होता मात्र येथील नेते दबाव टाकून आघाडीत बसले. हे सरकार लवकर जाईल. हा मुख्यमंत्री स्वाभिमानी नसून, त्यांची नैतिकताही नाही. अनेक नावे समोर येतील पण आता सांगणार नाही सिक्रेट बाहेर येईल. संजय राठोडचा राजीनामा घेतला म्हणून प्रकरण बासणात बांधलं गेलं तसं होऊ देणार नाही. या चौकशीतून खरे आरोपी बाहेर येतील. असे राणे यांनी सांगितले. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची पंधरा दिवसांत चौकशी करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नैतिक मुद्द्याच्या आधारावर गृहमंत्री देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

तत्पूर्वी देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीत देशमुख यांनी पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय बोलून दाखविला. त्यास पवार यांनी होकार दर्शविला, त्यानंतर देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीरसिंह यांनी आरोप केल्यानंतर आम्ही निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आज सीबीआय चौकशीचा आदेश दिल्याने देशमुख यांनी हे पाऊल उचलले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांच्या रूपाने ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. त्याआधी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com