मुख्यमंत्री संपत्ती तर मुंडे मुलं लपवतात; किरीट सोमय्यांचा पुनरूच्चार - Bjp leader Kirit somaiya slams CM Uddhav Thakrey and Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री संपत्ती तर मुंडे मुलं लपवतात; किरीट सोमय्यांचा पुनरूच्चार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

मुख्यमंत्री ध्दव ठाकरे यांच्यामध्ये हिमंत असेल तर त्यांनी संपत्तीचे अॉडिट करावे.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उध्दव ठाकरे यांच्यामध्ये हिमंत असेल तर त्यांनी संपत्तीचे अॉडिट करावे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीची माहिती लपविली आहे. मुख्यमंत्री संपती लपवत आहेत, तर दुसरीकडे एक मंत्री मुंडे मुलं लपवतात, याचा पुनरूच्चार सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांच्याकडून संपत्तीच्या मुद्यावरून ठाकरे परिवारावर सतत टीका केली जात आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचे अॉडीट करण्याची मागणी केली. अन्वय नाईक प्रकरणातील मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अन्वय नाईक यांच्याकडून घेतलेल्या जमिनीची माहिती उद्धव ठाकरे यांनी द्यावी. 

हिंमत असेल तर त्याचे फाॅरेन्सिक आॅडिट करा. पैसा किती आला, कुठे गेला, बंगले किती घेतले यांचे आॅडिट करा. तुम्ही १० कोटींची संपत्ती घेतली आणि फक्त २ कोटी १० लाखांचे पुरावे दिले आहेत. त्याचे खरेदीखत देखील आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात न देता लपविली. आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली आहे. एक आठवड्याची वाट पाहून पुढची भूमिका स्पष्ट करू, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

किरीट सोमय्या यांचे आरोप...

अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारात तीन हजार कोटींचा जमीन गैरव्यवहार झाला आहे. या दोन परिवारामधील जमीन व्यवहाराचे २१ सातबारा उतारे समोर आले आहेत. गाव कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी २१ प्लॉट रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रविंद्र रायकर यांना विकले असल्याचे कागदपत्रांवरून दिसते. यातील काही जमीन वन, खाजगी वने असल्याचे वाटते. या जमिनीस वनेतर वापरास बंदी आहे. वनेतर वापरासाठी केंद्र शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे, असे आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधातही तक्रार...

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी निवडणुक आयोगाकडे याबाबतची लेखी तक्रार केली आहे. मुंडे यांनी दुसरे लग्न केल्याचे सार्वजनिकरीत्या मान्य केले आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी कबुल केले आहे. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने मुंबई पोलीसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख