Narayan Rane's Emotional Letter : '' साहेब,मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही,मला...''; नारायण राणेंचं भावनिक पत्र

Political News : ...याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे
Narayan Rane, Balasaheb Thackeray
Narayan Rane, Balasaheb ThackeraySarkarnama

Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. देशाच्या कानाकोपर्यातून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. याचवेळी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही बाळासाहेब ठाकरें(Balasaheb Thackeray)ना अभिवादन करताना लिहिलेल्या पत्राद्वारे आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.

एकेकाळचे कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असलेले नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील बाळासाहेबांना ट्विटरवर पोस्ट शेअर करत अभिवादन केले आहे. या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या पत्रात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

नारायण राणे पत्रात नेमकं काय म्हणालेत?

आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला.

सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे असंही राणे पत्रात म्हणाले आहेत.

Narayan Rane, Balasaheb Thackeray
Sanjay Shirsat : बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारलं पाहिजे..

1966 मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आणि जो विश्वास दाखवीत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पाहत नसत.

मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे अशा शब्दांत राणेंनी बाळासाहेबांचं थोरपणाविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Narayan Rane, Balasaheb Thackeray
Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी नांदी; ठाकरे गट - वंचित युतीची अधिकृत घोषणा

पुढे राणे म्हणतात, शाखाप्रमुख,मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्य झाला आहे. त्यांनी आपला भक्कम पाठिंबा दिला. म्हणूनच मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या उण्यापुऱ्या नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत लक्षात राहील असं काम करू शकलो. 39 वर्षे मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातल्या आठवणी आणि त्यांनी मला दिलेलं प्रेम याबद्दल लिहिता लिहिता कागद संपून जाईल पण आठवणी संपणार नाहीत असंही राणे यांनी पत्रात म्हणतात.

आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही.

साहेब, तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलंत. सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मला दोनदा फोन केलेत. तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा ? असंही ते म्हणाले आहेत.

त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं. ते करता येत नसल्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा अशा शब्दांत राणेंनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in