राजीनामा घेऊन संजय राठोडांवर अन्याय; बंजारा धर्मपीठ पाठीशी उभे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला आहे.
banjara dharmapeeth supports shivsena mla sanjay rathod
banjara dharmapeeth supports shivsena mla sanjay rathod

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन बंजारा समाजावर अन्याय करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण न करताच राजीनामा घेणे ही चूक आहे. त्यामुळे बंजारा समाजाचे धर्मपीठ संजय राठोड यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका महंत जितेंद्र महाराज यांनी घेतली आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. या वेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

यानंतर बंजारा समाजाचे धर्मपीठ राठोड यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. याबद्दल बोलताना महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन बंजारा समाजावर अन्याय झाला आहे. यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण न करताच राजीनामा घेणे ही चूक आहे. त्यामुळे बंजारा समाजाचे धर्मपीठ संजय राठोड यांच्या पाठीशी असून, कोरोना संपल्यावर आम्ही मोठी बैठक घेऊन यासंदर्भात बंजारा समाजाच्या वतीने पुढची समाजाची काय भूमिका असणार हे ठरवणार आहोत. 

संजय राठोड पोहरादेवी येथे येणार का यासंदर्भात विचारले असता महंत जितेंद्र महाराज यांनी नक्की माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाने अत्यंत घाणेरडे राजकारण करत माझ्याबरोबर समाजाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय, सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. प्रकरणातील सगळे सत्य बाहेर यावे, अशी माझीही इच्छा आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली होती. विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता.१ मार्च) सुरु होत असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे विरोधकांनी सांगितले होते. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही होता. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविड काळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले होते, असेही सांगण्यात येत होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com