थोरात म्हणतात, महाविकास आघाडीने 80 टक्के तर काँग्रेसने 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायती जिंकल्या!

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागले असून, यात काँग्रेसला मोठे यश मिळाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
balsahaeb thorat says congress wins more than four thousand gram panchayats
balsahaeb thorat says congress wins more than four thousand gram panchayats

मुंबई : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने 80 टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 

थोरात म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांच्या या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवल्याचे समोर आले आहे. राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला असून, भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे. 

विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल दिला आहे. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले असून, 50 टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असेही  थोरात म्हणाले. 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून 14 हजार पैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतली आहे. ही आघाडी आणखी वाढणार असून राज्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.याचा समाचारही थोरात यांनी घेतला. 

थोरात म्हणाले की, आजच्या निकालातून राज्यभर भाजपची झालेली पीछेहाट दिसत आहे. हे भाजपच्या धोरणांचे अपयश आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आले नाही. भाजप नेत्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर  करून आपलाचं पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा केला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com