attempt to commit suicide by teacher in MLA hostel but many leaders rush to save him | Sarkarnama

शिक्षकाचा आमदार निवासातच आत्महत्येचा प्रयत्न : नाना पटोले, उदय सामंतांसह आमदारांची धावपळ

राजू सोनवणे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

विनाअनुदानित शाळांतील हजारो शिक्षकांचे वेतन रखडले आहे. 

मुंबई : शिक्षक म्हणून गेली 15 वर्षे काम करूनही वेतन मिळत नसल्याने वैतागल्याने एका शिक्षकाने मुंबईतील आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने अनेक नेते, पोलिस आणि अग्निशामन दलाची धावपळ उडाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि इतर आमदार चौथ्या मजल्यावर जाऊन खैरे यांना लेखी आश्वासन दिले. सामंत यांना हा शिक्षक ऐकत नसल्याने समजूत काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ही चौथ्या मजल्यावर पोहोचले. सायंकाळी साडेसहा नंतर हे नाट्य सुरू झाले. 

गळ्याला ब्लेड लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न खैरे नावाच्या शिक्षकाने केला. तसेच सोडविण्यासाठी येऊ नका, थेट निर्णय घ्या, असा इशाराही त्यांनी दिला. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे स्वतः घटनास्थळी पोहोचेल. ``खैरे सर मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही खाली उतरा. तुम्ही असे पाऊल उचलू नका. मी उद्याच त्यावर तोडगा काढतो,`` असे आश्वासन नानांनी दिले. याबाबत आठ दिवसांत जीआर काढण्याचे आश्वासनही या शिक्षकाला देण्यात आले. 

राज्यभरात विनाअनुदानित शाळांतील हजारो शिक्षक तुटपुंज्या किंवा विनापगारी काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात गेली काही वर्षे नाराजीची भावना आहे. ती भावना खैरे यांच्या कृतीतून व्यक्त झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.  

आत्महत्येचा प्रयत्न करणारे शिक्षकांचे नाव गजानन खैरे असून ते औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी 20 टक्के, 40 टक्के  वेतन अनुदान सरकारने घोषित केले होते. या वेतन अनुदानाचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करावा अशी मागणी घेऊन शिक्षणमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले होते. काल या शिक्षकांनी सीएसटी ते सर्व मंत्र्यांचे निवासस्थान पर्यत आंदोलन करायचे ठरवले होते. मात्र सुरवात करतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे ते आंदोलन झाले नाही. मात्र खैरे यांनी थेट आमदार होस्टेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करून सर्वच नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख