अन्वय नाईकांचे कुटुंबीय म्हणतात, एकाही भारतीयाने गोस्वामीला मदत करु नये! - anvay naik family welcomes maharashtra police action on arnab goswami | Politics Marathi News - Sarkarnama

अन्वय नाईकांचे कुटुंबीय म्हणतात, एकाही भारतीयाने गोस्वामीला मदत करु नये!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. 

मुंबई : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईचे नाईक कुटुंबीयांना स्वागत केले आहे. मी प्रत्येक भारतीयाला विनंती करते की, त्यांनी गोस्वामीला मदत करु नये, असे जाहीर आवाहन अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केले आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली.  २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. त्या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि कन्या अज्ञा यांनी या कारवाईचे स्वागत करीत पोलिसांचे आभार मानले आहेत. अक्षता नाईक म्हणाल्या की, आम्ही 2018 हे वर्ष कधीच विसरू शकत नाही. महाराष्ट्राच्या कन्येमागे उभे राहिल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे मी आभार मानते. माझ्या पतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तीन नावे लिहिली होती परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. माझ्या पतीच्या मृत्यूमागे अर्णब गोस्वामी आहे. मी प्रत्येक भारतीयाला विनंती करते की त्यांनी गोस्वामीला मदत करु नये. महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करुन आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. 

अज्ञा नाईक म्हणाल्या की, माझ्या वडिलांना त्या प्रकल्पावर पैसा व ऊर्जा खर्च करण्यासोबत रक्त आणि घाम गाळला होता. तरीही गोस्वामीने माझ्या वडिलांचे पैसे दिले नाहीत. त्याने सतत माझ्या वडिलांना धमक्या दिला. माझे आणि वडिलांचे करिअर संपवण्याची धमकीही त्याने दिली होती. 

अन्वय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यावेळी पोलिसांना सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख