एसटीचा संप मोडण्यासाठी परबांची रणनीती ठरली!

पहिल्या टप्यात पुणे, नाशिक, मुंबईतून एसटीची सेवा सुरू करण्याचे प्रयत्न.
एसटीचा संप मोडण्यासाठी परबांची रणनीती ठरली!
Anil Parabsarkarnama

मुंबई : राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी २२ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू आहे. सरकारकडून कामावर रुजू होण्याचे वारंवार आवाहन करून २५० आगारांमध्ये संप कायम आहे. प्रवाशांचे हाल आणि दैनंदिन तोटा वाढत असल्याने संप मोडण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू आहेत.

या संदर्भात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या गुप्त बैठकीत परिवहन विभाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. पहिल्या टप्यात पुणे, नाशिक, मुंबईतून एसटीची सेवा सुरू करण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. राज्य सरकारने संप मोडण्याची तयारी सुरू केली आहे. कर्मचारी संघटनांच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई न करण्याच्या अटीवर कामावर रुजू होण्याचे आवाहन केले जात आहे. या साठी मुंबई सेंट्रल मुख्यालयातील अधिकारी पुणे, नाशिक विभागात जाऊन चर्चा करत आहे. त्यासोबतच कर्नाटक आणि तेलंगणा सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत अभ्यास करण्यासाठी महामंडळातील लेखा अधिकाऱ्यांना संबंधित राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

शिवसेना स्टाईलचा वापर

संप मोडण्यासाठी परिवहन मंत्री शिवसेना स्टाईलचा वापर करणार असल्याचे सांगितले जात आहे. एसटीची सेवा सुरू करण्यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक आगारांमध्ये जाऊन संपकऱ्यांशी आणि प्रशासनाशी चर्चा करण्याचेही सांगितले आहे. त्यामुळे या संपाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.

Anil Parab
एसटी संपास गालबोट; वाहकाने नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

संपात एसटी महामंडळातील रोजंदार गट क्रमांक १, व २ आणि समय वेतनश्रेणी प्रकारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र, यापैकी कंत्राटी तत्त्वावर असलेल्या चालक, वाहक, सहायक तसेच यांत्रिकी आणि वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर २४ तासांत कर्तव्यावर रुजू न झाल्यास सेवामुक्तीचे आदेश देण्यावर बैठकीत एकमत झाले. विभाग नियंत्रकांच्या स्तरावरून मंगळवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ५०० पेक्षा अधिक नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. एकूण ५ हजार ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

एका दिवसासाठी आठ दिवसांची वेतनकपात

एसटीता संप २२ दिवस होऊनही मिटत नसल्याने कामावर गैरहजर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार एक दिवसाची गैरहजेरी असल्यास आठ दिवसांचे वेतन कापण्याचा नियम आहे. या नियमानुसार संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना एका दिवसासाठी आठ दिवसांचे वेतन कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Anil Parab
न्यायालय देईल तो निर्णय मान्य असेल : अनिल परब

निलंबित कर्मचाऱ्यांच्यावर बडतर्फीची तयारी

न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या २ हजार ५०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांवर आता बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

५६ बसगाड्या रस्त्यावर

महामंडळ आणि राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार कर्मचारी कामावर रुजू होत असल्याचा दावा महामंडळाने केला आहे. त्यानुसार साधी, शिवनेरी, शिवशाही अशा एकूण ५६ बसगाड्या रस्त्यावर धावल्या. त्यातून ८२४ प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in