शिवसेनेसह सर्व पक्षांचा भाजपला दणका - all parties target bjp in BMC standing committee election | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेसह सर्व पक्षांचा भाजपला दणका

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

महापालिका अधिनियम 1888 नुसार स्वीकृत नगरसेवकाला स्थायी समितीचे सदस्य होता येणार नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला. या हरकतीच्या मुद्द्याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत नगरसेवक म्हणून निवडून आलेलेच स्थायी समितीचे सदस्य होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी भाजपला दणका दिला. भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने स्थायी समितीचे कामकाज तहकूब करण्यात आले. तब्बल 7 महिन्यांनी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल 674 प्रस्ताव मांडण्यात आले होते.

लॉकडाऊननंतर आज प्रथमच स्थायी समितीचे कामकाज होणार होते; मात्र बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापालिका अधिनियम 1888 नुसार स्वीकृत नगरसेवकाला स्थायी समितीचे सदस्य होता येणार नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला. या हरकतीच्या मुद्द्याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत नगरसेवक म्हणून निवडून आलेलेच स्थायी समितीचे सदस्य होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला; तर समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीही या मुद्द्याला पाठिंबा देत कायद्यानुसार स्वीकृत सदस्याची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती होऊ शकत नाही, असे नमूद केले.

याप्रकरणावर भाजपची बाजू मांडताना गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वी स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आलेल्या शिवसेनेच्या सदस्याचे उदाहरण दिले. के. पी. नाईक हे 1998 ते 2002 मध्ये स्वीकृत नगरसेवक असताना त्यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिवसेना महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांना बगल देत सूडाचे राजकरण करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सर्व सदस्यांची भूमिका ऐकून घेत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करत असल्याचे जाहीर केले. के. पी. नाईक सदस्य असताना कोणी आक्षेप घेतला नसेल, पण,आता आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत कायदेशी बाजू समजून घेतली पाहिजे. शिरसाट यांची नियुक्ती चुकीची असल्याने ती रद्द करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

अडीच तास गोंधळ
सात महिन्यानंतर स्थायी समितीची बैठक होणार होती. त्यात अनेक महत्त्वाचे प्रस्तावही होते; मात्र शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करण्यावरून समितीत तब्बल अडीच तास गोंधळ सुरू होता.

भाजप न्यायालयात जाणार
यशवंत जाधव यांनी शिरसाट यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले; मात्र ते बाहेर न गेल्यामुळे बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा दिला. त्यावर भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख