मवाळ बाळासाहेब थोरातही झाले आक्रमक : राष्ट्रवादीच्या नेत्याचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूरच्या राजकारणात काॅंग्रेससाठी अनुकूल घटना
balasaheb thorat ff
balasaheb thorat ff

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष आपापला विस्तार करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. एकमेकांच्या पक्षातील नेते फोडायचे नाहीत, असा अलिखित नियमही शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांत आहे. तरी एकमेकांचे कार्यकर्ते, नेते फोडण्याचे काही थांबत नाही. या साऱ्या स्पर्धेत काॅंग्रेस पिछाडीवर पडल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचा मोठा नेता फोडण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

पारनेरमधील छोट्या नगरपंचायतीचे आपले पाच नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्यानंतर शिवसेनेने आकांडतांडव केले होते. ते प्रकरण इतके गाजले की राष्ट्रवादीला ते नगरसेवक परत द्यावे लागले होते. त्यानंतर या तीनही पक्षांत एकमेकांत घुसखोरी न करण्याचे धोरण ठरले होते. तरीही भिवंडीमधील काॅंग्रेसचे 18 नगरसेवक फोडून राष्ट्रवादीने कुरघोडी केली होती.
यावरून काॅंग्रेसमध्ये बरेच आकांडतांडव झाले. बाळासाहेब थोरात हे मवाळ अध्यक्ष असल्याने राष्ट्रवादीचा आक्रमकपणा वाढल्याचे बोलले जाऊ लागले.  

या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा घराणेशाहीतील नेता काॅंग्रेसमध्ये जाणार आहे. अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यातील धवलसिंह हे राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून काॅंग्रेसचा पंजा जवळ करणार आहेत.  त्यांच्या काॅंग्रेसमधील प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडी सुरू झाल्या आहेत. चार वर्षांतच त्यांनी दोन पक्ष बदलत आता तिसऱ्या पक्षात बस्तान बांधण्याचे ठरविलेले आहे. मोहिते पाटील हे २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता टिळक भवन दादर, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी सोलापूरच्या काॅंग्रेस नेत्यांनीही अनुकूलता दर्शविल्याने तेथे पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी अलीकडेच विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या या मागणीकडे पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष तर केलेच शिवाय त्यांना पक्ष संघटनेत देखील कुठेच संधी दिली गेली नाही. विधानसभा निवडणुकीत डाॅ. धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्यासाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रयत्न केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा वेळी धवलसिंह यांनी राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे जानकर हे जोरदार टक्कर दिली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यातील एका समर्थक आमदार गटानेच धवलसिंह मोहिते पाटील यांना  पक्षात स्थान मिळू दिले नसल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यानंतरही धवलसिंह यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप नेते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात अकलूजसह माळशिरस तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरसीने लढवल्या होत्या. या निवडणुकीत भाजप  विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झाली. अकलजूमध्ये माजी  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक पराभव करत तीन जागा मिळवल्या. मागील काही दिवसांपासून धवलसिंह राष्ट्रवादीची ताकद वाढवत असतानाच अचानक त्यांनी काॅग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. काॅंग्रेसने राष्ट्रवादीचा नेत्याला प्रवेश देण्याचे धाडस दाखवून महाविकास आघाडीत आपणही कमी नसल्याचे संकेत दिले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com