
मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे या संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे हा राष्ट्रवादीला एक धक्का होता. कुस्तीगीर परिषदेनंतर आता आणखी एका संघटनेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आता हेही अध्यक्षपदही त्यांना सोडावं लागणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी 11 जुलैला या संदर्भात एक परिपत्रक जारी केलं होतं. या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या घटनेत बदल करण्यात येणार आहे. या मार्गदर्शक सुचनांनुसार आता अजित पवारांनाही ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
अनिल खन्ना त्यांनी राष्ट्रीय क्रीडा महासंघ, राज्य ऑलिम्पिक असोसिएशन, यूटी ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि महासचिवांना पत्र पाठवत संबंधित संघटनांच्या घटनेवर आक्षेप घेतला होता. तसेच, यात अनेक त्रुटींकडे लक्ष वेधत त्यांनी तातडीने स्पोर्ट्स कोड लागू करण्याच्या सूचनाही दिल्या. या कोडमध्ये अनेक महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नियम -
नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २६ मार्च २०१३ रोजी अजित पवार यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. मात्र असोसिएशनच्या सध्याच्या नियमांनुसार आता कोणत्याही व्यक्तीला दोन टर्मसाठी किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटेनेच्या अध्यक्षपदावर राहता येणार नाही.
2013 पासून आतापर्यंत अजित पवार हेच या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नव्या नियमानुसार आता त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हे असोसिएशनचे अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांना स्पोर्ट्स कोडनुसार पुढील 5 वर्षे सदस्य वगळता इतर पदांवर संधी नसेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.