
Ajit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधीमंडळ दालनात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घऊन शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्याची कायदा सुव्यवस्था, निवडणूक आयोग, शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत अजित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले. "निवडणूक आयोगासारख्या संस्थांची स्वायत्तता टिकली पाहिजे. त्यांच्याबद्दल आदर कायम राहायला पाहिजे. ही स्वायत्तता टिकवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची देखील आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव, चिन्ह बाबत दिलेला निर्णय, हा अक्षरश: पक्षपाती असल्याची जनभावना आहे. याचाही विचार झाला पाहिजे," असेही अजित पवार यांनी सुनावले आहे.
पवार पुढे म्हणाले, "आमच्याशी एका शेतकऱ्याने संपर्क साधला, सोलापुरातील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विकल्यानंतर या शेतकऱ्याला २ रूपयांचा चेक मिळाला आहे. हे दुर्दैव आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते कोणीही असो, अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये.कांदा निर्यात करण्यासाठी ताबडतोब पावले उचलायला हवी. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदाला भाव मिळेल. आज मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ बसत नाही."
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले, पवार म्हणाले, "राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. प्रज्ञा ताई सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाना धमकी देण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्याचा आरोप झाला. ठाणे जिल्ह्यात काल पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, त्यात एकाचा मृत्यू झाली, हे प्रकरण गंभीर नाही का ? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना विविध यंत्रणांकडून येणाऱ्या नोटीस आणि होणाऱ्या कारवाईवरही अजित पवार यांनी भाष्य केले. "उद्धव ठाकरे यांच्या आमदार राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख यांच्या सारख्या नेत्यांना एसीबीच्या नोटीसी आलेल्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर छापे टाकण्यात आले. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे टाकण्याचे एकमेव काम केलं जात आहे, " असे अजित पवार म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.