
मुंबई : महाराष्ट्रातील रयतेचे अनेक प्रश्न गंभीर झालेले असतानाही राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे या जनतेच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २९ एप्रिलपासून रयत क्रांती संघटना आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली व आमदार गोपीचंद पडळकर यांना सोबत घेत "जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा" हे राज्यव्यापी अभियान राबवणार आहे.
रयत क्रांती संघटना राज्यव्यापी झंझावाती दौरा काढणार असून यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर सोबत असणार आहेत. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतु राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप व कारवाई तसेच भ्रष्टाचार यामध्ये गुंग झाले आहे.
आज महाराष्ट्रातील प्रमुख रयतेच्या समस्या, लोडशेडींग, अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विज बिलमाफी, शैक्षणिक समस्या, रखडलेल्या भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, लांबलेल्या निवडणूका, बोकाळलेला भ्रष्टाचार, गॅंगवार, दरोडे, खून, लूट, पेट्रोल डिझेल, दरवाढ, कोरोना, अतिवृष्टी, वादळ, महापुर, दुष्काळ, रासायनिक खत टंचाई, बोगस बियाणे, वेगवेगळे प्रदूषण, शेतमाल हमीभाव व पीकविमा या खऱ्या समस्या महाराष्ट्रामध्ये आहेत.
मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करून केवळ आरोप-प्रत्यारोप डायलॉग बाजी राजकीय विरोधकांसाठी विरोध हेच करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रयत हैराण, परेशान झाली आहे. या रयतेच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी रयत आक्रोश यात्रा काढण्यात येत आहे. यात्रेची सुरवात २९ एप्रिलला सिंधुदुर्गातून होणार असून त्यानंतर ३० एप्रिलला रत्नागिरी, एक मे रोजी कोल्हापूर, दोन मे रोजी सांगली, सात मे रोजी सातारा, आठ मे रोजी पुणे, नऊ मे रोजी नाशिक अशी मार्गस्थ होईल.
विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले आहे. कारण पंढरपूरमध्ये वीज कनेक्शन बंद केल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली व नगर जिल्ह्यामध्ये ऊस कारखान्याला जात नाही, म्हणून एका 80 वर्षाच्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्याने सुद्धा पुणे जिल्ह्यात आत्महत्या केली आहे. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील रयतेचे गंभीर झालेले असतानासुद्धा राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे या जनतेच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधावे, यासाठी रयत क्रांती संघटना "जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा" राज्यव्यापी झंझावाती दौरा काढणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.