after rajya sabha speech security of jaya bachchan house beefed up | Sarkarnama

बच्चन कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात? 'जलसा'बाहेरील बंदोबस्तात वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण पुढे करुन काही जण बॉलीवूडची बदनामी करीत आहेत. याचा समाचार जया बच्चन यांनी राज्यसभेतील भाषणात घेतला होता. 

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूड ढवळून निघाले आहे. बॉलीवूडमधीलच काही जण या क्षेत्राला बदनाम करण्याचे कारस्थान करीत असल्याचा आरोप होत आहे. खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत याचा काल समाचार घेतला होता. आता जया बच्चन यांना धमक्या येण्यास सुरूवात झाली असून, त्यांच्या 'जलसा' निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 

बॉलीवूडमधील ड्रग्जच्या व्यापाराबद्दल भोजपुरी अभिनेते व भाजपचे खासदार रविकिशन यांनी लोकसभेत केलेल्या टिप्पणीवर खासदार जया बच्चन यांनी काल (ता.15) राज्यसभेत जोरदार आक्षेप घेतला होता. चित्रपट क्षेत्राच्या जिवावर मोठे झालेल्या काही जणांकडूनच त्याच बॉलीवूडच्या बदनामीचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला होता. 'जिस थाली मे खाते है, उस मे छेद करते है, ये गलत बात है', अशा शब्दांत त्यांनी रवीकिशन आणि कंगना राणावत यांना नाव न घेता फटकारले होते. 

जया बच्चन म्हणाल्या होत्या की, लोकसभेत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे मला लाजिरवाणे वाटत आहे. चित्रपट उद्योग प्रत्यक्षपणे 5 लाख लोकांना तर अप्रत्यक्षपणे 50 लाख लोकांना रोजगार देतो. मात्र, या उद्योगाला सरकारचा काहीही पाठिंबा नाही. उलट सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा छळच होतो आहे. त्यात येथेच मोठे झालेले काही लोक या क्षेत्राबद्दल सोशल मीडियावर बेजबाबदारपणे बोलतात. काल लोकसभेत एक खासदाराने चित्रपटसृष्टीची तुलना गटाराशी केली. हे लज्जास्पद आहे. अशांना चाप लावण्याची आवश्यकता आहे. काही लोकांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला बदनाम करणे या लोकांनी थांबवावे. 

जया बच्चन यांचे नाव पुकारल्यावर त्यांनी आपल्याला मास्क घालून बोलण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले होते. यावर सभापती वेंकय्या नायडू यांनी, इतके सुंदर व्यक्तिमत्व दिसत आहे व इतके प्रसिध्द नाव आहे. त्यांना स्वतःचा परिचय देण्याची गरज काय, अशी टिप्पणी केली होती. तोच धागा पकडून बच्चन म्हणाल्या होत्या की, मला हे ज्यामुळे नाव मिळाले त्या फिल्म इंडस्ट्रीला ड्रग व्यापाराशी जोडून बदनाम करण्याचे प्रकार सुरू आहेत. 

जया बच्चन यांच्या कालच्या भाषणानंतर बॉलीवूडमधील अनेक जणांनी त्यांचे कौतुक करीत पाठिंबा दर्शविला. याचवेळी सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य करण्यात आले. याचबरोबर काल शेम ऑन जया बच्चन हा हॅशटॅग ट्रेडिंग होत होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया बच्चन यांना सोशल मीडियावरुन धमक्या येत आहेत. याचा विचार करुन मुंबई पोलिसांनी महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जुहूतील 'जलसा' निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या प्राथमिक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख