
बोरिवली : ''मी दिसलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला वाटेल मी पण गुवाहाटीला गेलो. ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, प्रेम आणि हवं ते सगळं दिलं त्यांनी आपलाच विश्वासघात केला. पाठीत खंजीर खुपसलं,' अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray News) यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे बोरीवलीतील शिवसेनेच्या (Shivsena) शाखेत बोलत होते.
मी आता पर्यंत ज्या ज्या शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या तिथे मला हेच दिसलं की, विश्वासघात करणारे गेले पण शिवसैनिक कुठेही गेला नाही, जे गेले ते गेले आता त्यांनी तिथेच सुखी राहावं. स्वतः ला विकले, की कोणती फाईल होती माहीत नाही, मुळात फुटीरतावादी आणि गद्दारांवर मला बोलायचंच नाही. सत्तेतून पळून जाणं, हे पहिल्यांदाच दिसलं, पण का गेले हे कोणालाच माहिती नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
तुमच्यावर कोणता दबाव होता, दडपण होतं त्यामुळे तुम्ही गेलात तर जा, पण आता आम्हाला तुम्हाला काहीही विचारायचं नाही. तुम्ही जिथे गेलात तिथेच आनंदी रहा, पण एवढी तरी लाज ठेवा, राजीनामे द्या, निवडणुकीला सामोरे जा, जनता जे काही ठरवेल ते मान्य करु. पण दूसरीबाजू अशी पण आहे की, ज्यांना पळवलं गेलं आहे, ज्यांना फसवून नेलं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीची दारं आजही खुली आहेत, असा विश्वासही आदित्य यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मी 15 वर्षांपूर्वी बंड बघितलं होतं, ते कुठे आहे ते तुम्हालाही माहिती आहे, मलातर माहीत ही नाही. शिवसेनेचा इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी बंड केलं ते कधीही टिकले नाहीत. असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. फुटीरतावादी, गद्दार कसे असतात असा सवाल करत आदित्य ठाकरे म्हणाले, इथून सुरत, गुवाहाटी, झाडी, गोवा आणि मग सकाळी 6 वाजता सगळं ओक्के, पण याला बंडखोरी म्हणत नाही, बंड करायलाही हिंमत लागते. बंड चुकीच्या गोष्टींच्या विरोधात होते, पण इथे कारण नसताना, काही तरी कारण दिलं, स्वतःची राक्षसी महत्वकांक्षा बघून हे गद्दारी केली.
तुम्हाला जायचं होत पण तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर सर्जरी झाली, ते भेटू शकत नव्हते, पण फोनवरुन त्यांची सर्व कामे सुरु होती, तेव्हा तुम्ही त्यांना सोडून गेलात, तेव्हा तुम्ही आमदारांची जमवा जमाव केली. डान्सचा व्हिडीओ बघून मला किळस वाटली. आसाममध्ये पूर आलेला असताना हे मज्जा करत होते. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसत, ते त्यांनी दाखवून दिलं. आम्ही राजकारण कमी केलं, हीच आमची चूक झाली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.