मोटारीचे सारथ्य करीत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यासह शिवाजी पार्कवर

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरला आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवर न होता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होत आहे.
aditya thackeray reach at shivaji park with chief minister uddhav thackeray
aditya thackeray reach at shivaji park with chief minister uddhav thackeray

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऐतिहासिक ठरत आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: मोटार चालवत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना घेऊन सायंकाळी शिवाजी पार्कवर दाखल झाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना दिली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याला सुरूवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते असे मोजकेच निमंत्रित मेळाव्याला उपस्थित होते. यामुळे हा मेळावा आगळावेगळा ठरला आहे. 

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य दसरा मेळावा यावर्षी मात्र तेथे झाला नाही. याला कारण होते कोरोना महामारीचे. शिवसैनिक आतुरतेने दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा तो सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त  ५० जणांच्या उपस्थितीत झाला. यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. हा मेळावा शिवाजी पार्क परिसरातीलच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा उपाययोजना जाहीर केल्या होत्या. यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतो. त्यावेळी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. एवढा मोठा जनसमुदाय जमल्यास सरकारनेच घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार असल्याने हा मेळावा शिवाजी पार्कवर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडलवरुन करण्यात आले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. उद्धव ठाकरे हे 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. मात्र, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाल्यापासून दसरा मेळावा हा पक्षासाठी सर्वांत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com